- २०३१ मध्ये विश्वचषकाचे बांगलादेशसोबत संयुक्त यजमानपद
- आयसीसीकडून २०३५ पर्यंतच्या प्रमुख स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर
बाली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०३५ पर्यंतच्या प्रमुख पुरुष क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनाचे वेळापत्रक निश्चित केले आहे. या निर्णयामुळे भारताला दोन महत्त्वाच्या स्पर्धांच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. २०२९ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भारताकडे सोपवण्यात आले असून, २०३१ मधील एकदिवसीय विश्वचषक भारत आणि बांगलादेश संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. आयसीसीच्या रविवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या वेळापत्रकाला मंजुरी देण्यात आली.
भारतामध्ये ९ ते २८ ऑक्टोबर २०२९ या कालावधीत चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. तब्बल २३ वर्षांनंतर भारताला या स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळणार आहे. यापूर्वी २००६ मध्ये भारताला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते. याशिवाय २०३१ चा एकदिवसीय विश्वचषक ९ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत भारत आणि बांगलादेशमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारताने यापूर्वी २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे यशस्वी आयोजन केले होते.
आयसीसीने २०२८ ते २०३५ या कालावधीतील टी-२० विश्वचषक आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यांचे नियोजनही स्पष्ट केले आहे. २०२८ मधील टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये १२ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबरदरम्यान होईल. तर २०३० मधील टी-२० विश्वचषकाचे आयोजन इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंड संयुक्तपणे करणार आहेत. २०३२ आणि २०३४ मधील टी-२० विश्वचषकांच्या यजमान देशांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यांचेही नियोजन
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे अंतिम सामने दर दोन वर्षांनी जून महिन्यात आयोजित केले जाणार आहेत. २०२९ आणि २०३१ मधील अंतिम सामन्यांच्या आयोजनाची जबाबदारी इंग्लंडकडे असेल. २०३३ आणि २०३५ मधील अंतिम सामन्यांच्या यजमानांबाबतचा निर्णय नंतर जाहीर केला जाणार आहे.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांनी या निर्णयाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख स्पर्धांचे दीर्घकालीन वेळापत्रक निश्चित झाल्यामुळे सदस्य देशांना नियोजन करणे सोपे होईल. तसेच खेळाडूंच्या विकासासाठी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी प्रभावी योजना आखता येतील. या नियोजनामुळे जगभरात क्रिकेटच्या विस्तारालाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
