घरगुती पाहुणचारासाठी प्रीमियम फूड डिलिव्हरीला पसंती!

 



मुंबई / विशाल ब्राम्हणे

MAHARASHTRA WEBNEWS


घरगुती पाहुणचाराची पद्धत बदलत असून कौटुंबिक कार्यक्रम, स्नेहभोजन आणि मित्रमंडळींच्या मेजवानीसाठी प्रीमियम रेस्टॉरंट्समधून खाद्यपदार्थ मागवण्याचा कल वाढत आहे. पूर्वी वेळ वाचवण्यासाठी वापरले जाणारे फूड डिलिव्हरीचे माध्यम आता घरच्या पाहुणचाराचा दर्जा उंचावण्याचे साधन बनत आहे. रेडसीरच्या ‘स्टेट ऑफ इंडियाज फूडसर्व्हिसेस मार्केट २०२६’ या अहवालानुसार, देशातील फूड सर्व्हिस बाजारपेठेत ऑनलाइन डिलिव्हरीचा सध्या ११ टक्के वाटा असून, पुढील पाच वर्षांत तो २० टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

या बदलत्या ग्राहक पसंतीकडे पाहताना रेस्टॉरंट्सनी डिलिव्हरीकडे केवळ व्यवसायवाढीचे माध्यम म्हणून न पाहता आदरातिथ्याचा विस्तार म्हणून पाहणे आवश्यक असल्याचे मत बेलोना हॉस्पिटॅलिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि ‘ईशारा’चे संस्थापक प्रशांत इस्सर यांनी व्यक्त केले.

ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांबाबत बोलताना इस्सर म्हणाले की, कुटुंबीय किंवा मित्रांसोबतच्या जेवणासाठी ग्राहक जेव्हा विविध पदार्थांची ऑर्डर देतात, तेव्हा ते केवळ अन्नपदार्थ मागवत नसतात, तर पाहुणचाराची जबाबदारीही रेस्टॉरंटकडे सोपवत असतात. त्यामुळे पदार्थ वेळेत पोहोचण्याबरोबरच रेस्टॉरंटची गुणवत्ता, चव आणि आदरातिथ्याचा अनुभव घरापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे ठरते.

ग्राहकांच्या या अपेक्षा लक्षात घेऊन प्रीमियम रेस्टॉरंट्सकडून डिलिव्हरीसाठी स्वतंत्र मेन्यू आणि पॅकिंग पद्धती विकसित केल्या जात आहेत. प्रवासादरम्यान रोटी-नानचा कुरकुरीतपणा टिकवणे, डंपलिंग्सची योग्य हाताळणी करणे आणि सॉस स्वतंत्रपणे पॅक करणे यांसारख्या बाबींवर विशेष लक्ष दिले जात आहे. मोठ्या ऑर्डर्सच्या बाबतीत ग्राहकांना केवळ जलद डिलिव्हरीपेक्षा ठरलेल्या वेळेत आणि योग्य स्थितीत खाद्यपदार्थ मिळणे अधिक महत्त्वाचे वाटत असल्याचेही या बदलातून दिसून येते.

पूर्वी रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले जात होते; आता ग्राहकांचे घर हेच रेस्टॉरंटसाठी नवे ठिकाण बनले आहे. त्यामुळे डाइन-इन असो किंवा घरपोच सेवा, दोन्ही ठिकाणी चव, गुणवत्ता आणि आदरातिथ्याचा समान अनुभव देणे हे प्रीमियम रेस्टॉरंट्ससमोरील महत्त्वाचे आव्हान आणि संधी असल्याचे प्रशांत इस्सर यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post