भातसा धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा

ठाणे : ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुरू झालेल्या पावसामुळे भातसा धरणाच्या पातळीत वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता भातसा धरणाची पाणी पातळी ९४.९६७ इतका झाला आहे. त्यामुळे काही दिवसात धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. भातसा धरण ओव्हर फ्लो झाल्यास त्याचा फटका धरण क्षेत्रातील नागरिकांना बसू शकतो, त्यामुळे भातसा नदी किनाऱ्यावरील सायगाव पूल तसेच सापगाव व नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती भातसा धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता र.भा.पवार यांनी दिली आहे. भातसा धरणसाठा १४०.२४ मी. एवढा आहे. 

संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने दांडी मारल्यानंतर नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली होती. जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट पसरले होते. मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने पुनरागमन केल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

भातसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणाच्या पातळीत वाढ होत आहे. भातसा नदीच्या तिरावरील विशेषतः शहापूर, मुरबाड रस्त्यावरील सायगाव पूल तसेच सापगाव व नदीकाठावरील इतर गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांना व गावातील नागरीकांना नदीच्या पाण्याच्या पातळी वाढ होण्यासंदर्भात सूचना व या कालावधीत कोणीही वाहत्या नदीच्या पाण्यात प्रवेश न करण्याबाबत दक्षता घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post