रोह्यात सारस्वत समाजबांधवांचे स्नेहसंमेलन

 


खांब : रायगड जिल्ह्यातील सारस्वत समाजबांधवांचे स्नेहसंमेलन रविवार १२ मे रोजी रोह्यातील मातोश्री मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडले. सारस्वत हितवर्धक मंडळ, मुंबई आयोजित असलेले हे स्नेहसंमेलन, रायगड जिल्हा सारस्वत ब्राह्मण मंडळ, अलिबाग व रोहा सारस्वत परिवार यांच्या सहकार्याने घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सारस्वत हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ सिनकर तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ, निवेदक प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.

 सर्वप्रथम आलेल्या समाजबांधवांचे स्वागत नयन बागाव व ईशा तेंडुलकर यांनी त्यांच्या गीत गायनाने केले. त्यानंतर दीपक मुळ्ये यांनी स्नेहसंमेलनाचा हेतू विषद केला. नंतर मंडळाची आजवरची वाटचाल विनायक किनरे यांनी अत्यंत थोडक्यात सोप्या पद्धतीने मांडली. संपुर्ण राज्यात व काही प्रमाणात राज्या बाहेरही विविध सारस्वत संस्था कशाप्रकारे कार्य करत आहेत या बाबीचा थोडक्यात परिचय प्रमोद तेंडुलकर यांनी उपस्थितांना करुन दिला. नंतर सारस्वत समाजातील स्थानिक कलाकार व कावतकर बागाव ईशा तेंडुलकर, स्वप्नेश किनरे, महेश कुवळेकर यांनी आपली गायन कला सादर केली. विशेष म्हणजे इशा तेंडुलकर हिच्या सुंदर बासरी वादनाने सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

 दुपारच्या सत्रामध्ये प्रसाद कुलकर्णी यांचा आनंदयात्रा हा मनोरंजनाचा एकपात्री कार्यक्रम झाला. अत्यंत हलक्याफुलक्या व कविता, शायरीच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये घडत असलेल्या चुकीच्या पद्धतीच्या बदलांवर भाष्य केले. जीवन हे अत्यंत आनंदी व सकारात्मक पद्धतीने रसरसुन जगले पाहिजे या संदेशावर बेतलेला त्यांचा हा कार्यक्रम उपस्थितांना चांगलाच विचारप्रवृत्त करणारा होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेश कावतकर व विनायक किनरे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहन कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल रोहा सारस्वत परिवाराचे अध्यक्ष योगेश तेंडुलकर यांनी सर्वांचे आभार मानले. व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post