ठाणे, ( रिना सावर्डेकर ) : ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये बॅनरबाजीचे वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे ठाणे हे बॅनरचे शहर असे संबोधले तरी काही वावगे ठरणार नाही. तरीही ठाणे महापालिकेमार्फत मागील डिसेंबर महिन्यात सर्व प्रभागांमधून ३८९१ अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्यात आले. तर, ७६ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत फलक हटवण्याची मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
महापालिका क्षेत्राचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी दैनंदिन मोहीम राबवून अनधिकृत फलक हटवण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत, मा. उच्च न्यायालयाचेही अतिशय काटेकोर आदेश आहेत. त्याचे पालन सगळ्यांनी करावे. अनधिकृत पोस्टर, बॅनर, फलक लावला की त्यावर नोटीस आणि गुन्हे दाखल करणे ही कारवाई अतिशय प्रभावीपणे करण्यात यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समितीमार्फत डिसेंबर महिन्यात ३८९१ अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्यात आले. ही कारवाई सहाय्यक आयुक्तांमार्फत सातत्याने सुरू आहे. एकूण ७६ प्रकरणात गुन्हेही दाखल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (अतिक्रमण) शंकर पाटोळे यांनी दिली. तसेच, ठाणे महापालिका हद्दीत अधिकृत फलक लावण्यासाठी जाहिरात विभागाने जागा निश्चित केल्या आहेत. त्याचे शुल्क भरून केवळ त्याच ठराविक भागात फलक लावता येणार आहेत. त्याबाबत संबंधितांनी सहकार्य करावे असे आवाहन उपायुुक्त शंकर पाटोळे यांनी केले आहे.
