ठाणे, ( रिना सावर्डेकर) : इयत्ता १० वी व १२ वी ची परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त व्हावी यासाठी २६ जानेवारीपर्यंत जनजागृती सप्ताह ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढ होऊन विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळण्यास मदत होईल म्हणून अभियान यशस्वीपणे राबवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील इयत्ता १० वी १ लाख ३ हजार ७१८ विद्यार्थ्यीं व १२ वी १ लाख २१ हजार २४४ असे एकूण ०२ लाख २४ हजार ९६२ विद्यार्थी या परीक्षांत सहभागी होणार आहेत. परीक्षा केंद्रांवर निष्पक्षता आणि पारदर्शकता वाढणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी २० ते २६ जानेवारीपर्यंत जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहितुले यांनी दिली.
या अभियानामार्फत स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा विकास व व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक व प्राचार्य, शिक्षक यांना संयुक्त सभेमध्ये कॉपीमुक्त अभियानाची शाळा पातळीवर अंमलबजावणी करणे बाबत माहिती देणार आहेत. आज, मंगळवारी दि. २१ जानेवारी, रोजी कॉपी मुक्त अभियानाची शपथ सर्व शाळांमध्ये परिपाठाच्या वेळी घेण्यात येणार आहे.
बुधवारी दि. २२ जानेवारी, रोजी शाळा स्तरावर मंडळ शिक्षा सूची चे वाचन करण्यात येणार आहे. गुरुवार दि. २३ जानेवारी, रोजी परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा आहार व आरोग्याची काळजी याबाबत तज्ज्ञामार्फत शाळांमध्ये पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शुक्रवारी दि. २४ जानेवारी, राजी परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासाची तयारी, परीक्षा तणावमुक्त वातावरणात कशी देता येईल, उत्तरपत्रिका कशाप्रकारे लिहाव्यात याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
शनिवार दि. २५ जानेवारी, रोजी कॉपीमुक्त अभियानाच्या जागृतीसाठी कॉपी मुक्ती घोषवाक्यांचा शाळा परिसरात जनजागृती फेरी काढणे, रविवारी दि. २६ जानेवारी, रोजी ग्रामसभा बैठकीमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक यांनी कॉपीमुक्त अभियाना संदर्भात वरील विषयाबाबत माहिती देणे व याबाबत जनजागृती करणे व कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन करणे, असे उपक्रम हे या सप्ताहात राबविण्यात येणार आहे.
000