युवक संघटन बळकटीसाठी कृष्णराज महाडिक यांची रणनिती
कोल्हापूर \ शेखर धोंगडे : भारतीय जनता पार्टीच्या युवा आघाडीला अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापुरात जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन केले. पक्ष संघटन मजबूत करणे, मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी राबवणे आणि आगामी उपक्रमांची आखणी करणे, यावर बैठकीत भर देण्यात आला.
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर येथील भाजप कार्यालयात ही पहिलीच बैठक घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राज्यभरात किमान एक लाख युवा सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यापैकी १५ ते २० हजार सदस्य नोंदणीचे लक्ष्य कोल्हापूर जिल्ह्याला देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
युवतींसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा मानस व्यक्त करताना रोजगार निर्मिती, क्रीडा कौशल्य विकास आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच येत्या मे महिन्यात युवा आघाडीचा राज्यस्तरीय कार्यक्रम कोल्हापुरात घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून त्याचे नियोजन मार्चपासून सुरू होणार आहे.
बैठकीस युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्वजित पवार, जिल्हाध्यक्ष प्रशांत बुगले, रविश पाटील-कौलवकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार विश्वजित पवार यांनी व्यक्त केला. विरोधकांकडून भाजप सरकारविरोधात पसरविल्या जाणाऱ्या ‘खोट्या नरेटिव्ह’ला ठामपणे उत्तर देण्याचा इशारा प्रशांत बुगले यांनी दिला.
नूतन प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरसह राज्यभर युवा शाखा विस्तारल्या जातील आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही रविश पाटील-कौलवकर यांनी दिली.
पहिल्याच बैठकीतून युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. यावेळी वल्लभ देसाई, अनिकेत अतिग्रे, विवेक राजवर्धन यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
