अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी : मध्यपूर्व आशिया तसेच आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) या तीनही कंपन्यांचे प्रतिनिधी व समन्वयक यांच्याशी संपर्क साधला. संबंधित कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप व गॅस एजन्सींमार्फत इंधनाचा नियमित पुरवठा सुरू आहे. नागरिकांनी पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन नागरिकांच्या सेवेस तत्पर असून संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे, असेही जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी नमूद केले आहे.
