अपघातात जखमी, मृत्यू पावलेल्या ऊसतोड कामगारांची माहिती कारखानदारांकडून मागविणार
कोल्हापूर, ( शेखर धोंगडे ) : लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत जिल्ह्यातील प्राप्त ३० ऊसतोड कामगारांच्या प्रस्तावांना आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सदर प्रस्ताव सानुग्रह अनुदनासाठी ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाकडे पाठवण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हास्तरावरील बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सदस्य सचिव ऊसतोड कामगार जिल्हास्तरीय समिती तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांनी या बैठकीत ऊसतोड कामगारांच्या प्रस्तावांची माहिती सादर केली. यावेळी वैयक्तिक अपघात, मृत्यू, अपंगत्व वैद्यकीय खर्च, बैलजोडी मृत्यू तथा अपंगत्व याबाबत आलेले विविध प्रस्तावाबाबत माहिती देण्यात आली. जिल्ह्यात एकूण ३१ प्रस्ताव आत्तापर्यंत प्राप्त असून यातील ३० प्रस्तावांना बैठकीत मंजुरी देण्यात आली तर एक प्रस्ताव नैसर्गिक मृत्यूचा असल्याचे सदस्य सचिव श्री साळे यांनी सांगितले. यावेळी प्रा. डॉ. सुभाष जाधव राज्य सरचिटणीस व प्रा. आबासाहेब चौगुले राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटना, डॉ. सुप्रिया देशमुख जिल्हा शल्यचिकित्सक, सदानंद बगाडे समाजकल्याण निरीक्षक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबत अजूनही जिल्ह्यात काही प्रस्ताव असल्यास याबाबतची माहिती कारखानदारांकडून मागवून घ्या अशा सूचना केल्या. ते म्हणाले पुढील आठ दिवसात अजून एक बैठक घेऊन नव्याने येणाऱ्या प्रस्तावांची छाननीही करावी. त्या अगोदर सर्व कारखान्यांना कळवून त्यांच्याकडील ऊसतोड कामगारांबाबतचे अपघात अथवा इतर घटनेबाबतची माहिती मागवून त्यांचे परिपूर्ण प्रस्ताव घ्या तसेच संबंधित कारखानदारांचे प्रमाणपत्रही घेऊन सर्व माहिती कळवल्याचे लेखी स्वरूपात घेऊन कोणीही या योजनेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. अशाच प्रकारे प्रत्येक ऊस तोडणी मोसमातील ऊसतोड कामगारांच्या अपघाताबाबतची माहिती दरवर्षी कारखानदारांकडून घेण्याची प्रक्रिया राबवावी याबाबतही त्यांनी सूचना केल्या. अपघात नोंदणीसाठी एक नोडल अधिकारी नेमून त्यासाठी त्रयस्थ संस्थेचेही मदत घ्या तसेच ऊसतोड कामगारांसाठी प्रत्येक वर्षी कारखाने बंद होताना आरोग्य शिबिरांचे आयोजन करा तसेच सुरुवातीलाही सर्वांची आरोग्य तपासणी होईल याची काळजी घ्या. राज्यस्तरावर ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाकडे प्रस्ताव जाताना कोणत्याही प्रस्तावामध्ये त्रुटी आढळून येऊ नयेत याचीही काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या बैठकीत दिल्या.
या योजनेअंतर्गत झोपडी आणि सामग्रीला आग लागल्यास दहा हजार रुपये सानुग्रह अनुदानाची रक्कम दिली जाते. वैयक्तिक अपघातामध्ये मृत्यू झाल्यास त्या कामगाराच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले जाते. अपघातामध्ये अपंगत्व आल्यास अडीच लाख सानुग्रह अनुदान, अपघातावेळी वैद्यकीय खर्चासाठी ५० हजार रुपये, बैल जोडी मृत्यू लहान पंच्याहत्तर हजार रुपये, बैलजोडी मोठी एक लाख रुपये असे सानुग्रह अनुदान देण्याची योजना आहे.

