ठाणे : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्घुण हत्या हा केवळ एक गुन्हा नाही, तर माणुसकीवरचा मोठा डाग आहे. ज्यांनी गावाच्या हितासाठी, जनतेच्या भल्यासाठी स्वतःचे आयुष्य झोकून दिले, त्यांनाच निर्दयपणे संपवले जाणे हे खूप क्रूर असल्याचे मत खासदार नरेश म्हस्के यांनी मोर्चादरम्यान काढले.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनिषेधार्थ ठाण्यात मंगळवारी शिवसेनेमार्फत आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी वाल्मिक कराड विरोधात घोषणा देत त्याचा प्रतिकात्मक पुतळ्यास पेटविण्यात आले. यावेळी खासदार म्हस्के यांनी एकेकाळी साधा पाणक्या असलेल्या वाल्मिक कराड या गुंडाने बीडमध्ये दहशतीचे साम्राज्य उभे केले, सामान्य नागरिकांपासून ग्रामसेवक, सरपंच, नगरसेवकांपर्यंत सर्वांना धाकात ठेवले. अखेर त्याच्या अमानुष प्रवृत्तीचा बळी संतोष देशमुख झाल्याचा आरोप त्यांनी केला.
या भ्याड कृत्याविरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चा काढण्यात आला आहे. शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फेदेखील मोर्चा काढण्यात आला. यावेळी "वाल्मिक कराडला भर चौकात फाशी द्या" अशी मागणी राज्यसरकारकडे आम्ही केली. गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारांवर तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आज जर गुन्हेगारीला मोकळीक दिली, तर उद्या पुन्हा कोणी तरी संतोष देशमुखसारख्या न्यायप्रिय माणसाचा बळी जाईल.
संपूर्ण शिवसेना आणि शिवसैनिक देशमुख कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील असे मत खासदार नरेश म्हस्के यांनी काढले. या आंदोलनात सर्व शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि शिवसैनिक सहभागी झाले होते.


