शिवसेनेचे निलेश बाबाराम पाटील यांचा आंदोलनाचा इशारा
दिवा \ आरती परब : दिव्यातील साबे रोड, साबेगाव, कोकणरत्न परिसर, गणेश मंदिर परिसर, यशोदा बाळाराम पाटील नगर, डी.जी. कॉम्प्लेक्स आदी भागांमध्ये गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तात्काळ पाणीपुरवठा नियमित न केल्यास शिवसेना विभाग प्रमुख निलेश बाबाराम पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दिवा प्रभाग समितीच्या पाणीपुरवठा विभागाला दिलेल्या निवेदनात पाटील यांनी सांगितले की, सध्याच्या वेळापत्रकानुसार दुपारी २ वाजता सुरू होणारा पुरवठा प्रत्यक्षात २:१५ वाजता सुरू होतो आणि केवळ २:४५ वाजेपर्यंतच चालतो. त्यानंतर संध्याकाळी ४:३० ते ४:४५ पाणी सोडले जात असले तरी ५:१५ वाजता पुरवठा बंद होतो. इतक्या कमी वेळेत नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा मिळत नसल्याने त्रास होत आहे.
महिलांनी व स्थानिकांनी पूर्वीप्रमाणे दुपारी २ ते ६ या वेळेत पाणी सोडावे, तसेच पुरेशा प्रेशरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. कमी दाबामुळे अनेक घरांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पाटील यांनी इशारा दिला की, येत्या आठ दिवसांत तात्काळ उपाययोजना न केल्यास शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिकांकडून पाणीपुरवठा विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल.