“यंग इंडिया – फिट इंडिया” मोहिमेअंतर्गत ‘सुपोषण जळगाव’ अभियान




निरोगी शरीर – निरोगी समाजाच्या दिशेने जळगाव जिल्हा परिषदेचा पुढाकार


जळगाव : बदलत्या जीवनशैलीमुळे विद्यार्थ्यांपासून ते प्रौढांपर्यंत जंक फूडच्या सेवनात वाढ होत आहे आणि त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून “यंग इंडिया – फिट इंडिया” मोहिमेअंतर्गत ‘सुपोषण जळगाव’ या आरोग्यजागृती अभियानाची सुरुवात मंगळवारी छत्रपती शाहू महाराज सभागृहात करण्यात आली.


या उपक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बेंगळुरू येथील नामांकित आहारतज्ज्ञ डॉ. देवजी यांनी उपस्थितांना संतुलित आहाराचे महत्त्व, पोषक घटकांची भूमिका, आणि निरोगी जीवनशैली कशी जोपासावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी तरुण पिढीला “फिट इंडिया” संकल्पनेचा भाग बनून स्वास्थ्यसंपन्न भारत घडविण्याचं आवाहन केलं.



या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, सीडीपीओ, तसेच आरबीएसके वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.


‘सुपोषण जळगाव’ अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये आरोग्यदायी आहारपद्धतीविषयी जागरूकता निर्माण करणे, जंक फूडपासून दूर राहण्याचं प्रबोधन करणे, आणि निरोगी समाज घडविण्यासाठी सकस आहाराची सवय लावणे हा आहे. निरोगी शरीर – निरोगी समाज या ध्येयाने सुरू झालेलं हे अभियान जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्यविषयक प्रयत्नांना नवी दिशा देणार आहे.




Tags : #SuposhanJalgaon #FitIndia #YoungIndia #HealthyLifestyle #ZPJalgaon #MeenalKaranwal #PublicHealth #NutritionAwareness #HealthyJalgaon #WellnessInitiative



Post a Comment

Previous Post Next Post