जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी उल्हासनदीची केली पाहणी
ठाणे : उल्हास नदीतील प्रदुषण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दि. १ एप्रिल, रोजी म्हारळ, वरप, कांबा येथे भेट देऊन उल्हास नदीतील जलपर्णीची पाहणी केली. यावेळी उल्हासनदीची व्यापकता पाहता तात्काळ कार्यवाही करण्यासाठी जलपर्णीबाबत ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पाठवावे ते प्रस्ताव शासनास पाठविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मार्गदर्शन केले. तसेच वाढलेली जलपर्णी काढून त्यापासून शोभेच्या वस्तू बनविण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने निश्चित केले आहे. यासाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून शोभेच्या वस्तू बनविण्याचे कामकाज करण्यासाठी विषेश प्रशिक्षण देऊन कामकाज करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली आहे.
वीड टू वेल्थ हा प्रकल्प आम्ही सुरू करणार आहोत. याअंतर्गत वीड म्हणजेच जलपर्णी ही नदीतून काढून त्या सुखवून त्यांचे रूपांतर शोभेच्या वस्तूंमध्ये केले जाईल. यासाठी महिला बचत गटांना प्रशिक्षित करून हे काम दिले जाईल. या शोभेच्या वस्तू विकून महिला बचत गटांना उत्पन्न मिळेल असे -ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी म्हटले.
उल्हास नदीपात्रातील जलपर्णी पाहता काम व्यापक व खर्चिक असल्यामुळे याबाबत प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना ग्रामपंचायतीना देण्यात आल्या. या भेटी दरम्यान अंबरनाथ पंचायत समिती ला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन १०० दिवस कृती कार्यक्रामांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच म्हारळ, वरप ग्रामपंचायत येथील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची सध्यस्थिती व जागेच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत कांबा येथील घनकचरा व्यवस्थापन जागेची पहाणी करून मार्गदर्शन केले.
यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) प्रमोद काळे, कल्याण चे तहसीलदार सचिन शेजाळ, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, म्हारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच निलिमा म्हात्रे, ग्रामपंचायत अधिकारी अमोल मुरबाडे, तसेच संबधीत अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.


