ठाणे : ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक १४ अंतर्गत येणाऱ्या लोकमान्य नगर परिसरात शिवसेना (शिंदे गट)च्या माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना प्रचार करत असताना स्थानिक नागरिकांनी थेट अडवून जाब विचारला. गेल्या दहा वर्षांत कोणताही ठोस विकास न झाल्याचा आरोप करत नागरिकांनी निषेधाचे पोस्टर व बॅनर हातात घेऊन संताप व्यक्त केला. ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केलेली नसली, तरी माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवारांनी पुन्हा उमेदवारी मिळेल या अपेक्षेने प्रभागांमध्ये प्रचार सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक १४ मधील लोकमान्य नगर परिसरात शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रचारासाठी आले होते.
या प्रचार रॅलीमध्ये माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, विजय चिंदरकर, संदीप डोंगरे, राकेश शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. मात्र, रॅली परिसरात पोहोचताच नागरिकांनी ती अडवत थेट
दहा वर्षांत काय केलं? असा सवाल केला. यावेळी “ठाणेकर तुपाशी, प्रभाग १४ उपाशी”, “विकासाच्या बाबतीत संपूर्ण ठाणे तुपाशी, आमचा पाडा उपाशी का?” अशा प्रकारचे बॅनर व पोस्टर झळकावत नागरिक रस्त्यावर उतरले होते. लोकमान्य नगर हा प्रभागातील मोठा व दाट लोकवस्तीचा भाग असतानाही, रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर तात्पुरती विकासकामे दाखवली जातात, मात्र निवडणुका संपल्यानंतर पाच वर्षे नागरिकांकडे पाठ फिरवली जाते. याला जबाबदार कोण?” असा थेट सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
नागरिकांच्या रोषाला सामोरे जाताना माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी यावर आपण भेटून बोलूया, असे सांगत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिकांचा असंतोष उघडपणे समोर आला असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विरोध सत्ताधाऱ्यांसाठी गंभीर इशारा मानला जात आहे.

