माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा



ठाणे :  ठाण्यात शिंदे सेनेत अंतर्गत नाराजीचे नाट्य उघडकीस आले आहे. शिंदे सेनेच्या ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या संघटक मीनाक्षी शिंदे यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तरी आपल्या विभागातील एका शाखा प्रमुखावर पक्षाने केलेल्या कारवाईमुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.


शिंदे सेनेतर्फे पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत निर्मल आनंद नगर (मनोरमा नगर) येथील शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांची शाखाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र शिंदे सेनेचे सचिव संजय मोरे यांनी जारी केले आहे. मात्र,  विक्रांत वायचळ यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे नाराज झालेल्या मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मीनाक्षी शिंदे या मागील काही दिवसांपासून महायुतीच्या बैठकांना नियमित हजेरी लावत होत्या. तसेच शिंदे सेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यानही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. असे असतानाही गुरुवारी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


विक्रांत वायचळ यांनी ‘स्थानिक उमेदवार हवा’ या मागणीसाठी आवाज उठविला होता. याच मुद्द्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर मीनाक्षी शिंदे आणि भोईर कंपनी यांच्यात आजही मतभेद असल्याचे दिसून येत आहेत. उमेदवार मुलाखतीच्या कार्यक्रमावेळीही शिंदे आणि भोईर कंपनीतील एका सदस्यामध्ये वाद झाल्याची माहिती शिंदे सेनेतील सूत्रांनी दिली आहे.





Post a Comment

Previous Post Next Post