नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप /डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत शिबीरांचे आयोजन करुन नागरिकांमध्ये हिवताप /डेंग्यू आजारांबाबत व डासउत्पत्ती स्थानांबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यात येते.
त्याचाच एक भाग म्हणून रमजान ईदचे औचित्य साधून सोमवारी नमुंमपा कार्यक्षेत्रातील मसजिद येथे नागरिकांकरीता विशेष हिवताप / डेंग्यू जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने नमुंमपा कार्यक्षेत्रात एकूण १२ मस्जिद ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून ५४० नागरिकांना हिवताप / डेंग्यू आजाराविषयक जनजागृती करण्यात आली व ९५ नागरिकांचे रक्तनमुने घेण्यात आले.
सदर शिबिरांचे वैशिष्टय म्हणून ॲनाफिलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात दाखवून, तसेच नागरिकांना डासांच्या आळ्या प्रत्यक्ष दाखवून, घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थाने उदा. पाणी साठवून ठेवलेले ड्रम हे ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करणे, त्याबरोबर पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे व आठवड्यातून एक दिवस स्वच्छ करुन कोरडे ठेवणे / भंगार साहित्य टायर्स इत्यादी नष्ट करणे / छतावरील प्लास्टिक शीट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू देवू नये व ताप येताच त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे याबाबत नागरिकांना प्रोत्साहित करुन, जनजागृती करण्यात आली.
तरी हिवताप / डेंग्यूसाठी कारणीभूत ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्ती घरांमध्ये व घराभोवतालील स्वच्छ पाण्यात होत असल्याने सर्व पाण्याचे साठे झाकून ठेवणे व घराबाहेरील / टेरेसवरील भंगार नष्ट केले तर नवी मुंबईत हिवताप / डेंग्यू आजारावर आळा घालणे शक्य होईल, असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.


