ठाण्यात नारळी पौर्णिमा जल्लोषात साजरी


कोळी बांधवांचा पारंपरिक सण महापालिकेच्या उपस्थितीत पारंपरिक रितीने पार पडला

ठाणे : ठाणे महानगरपालिका आयोजित नारळी पौर्णिमेचा सण आज कळवा येथे कोळी बांधवासोबत उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत सजलेले कोळी बांधव, वाद्यांचा गजर आणि पारंपरिक रितीभाती यामुळे परिसर जल्लोषात न्हावून निघाला.

कार्यक्रमाला माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक पवन कदम, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, सहायक आयुक्त सोपान भाईक आणि ललिता जाधव, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते.




कळवा खारटन रोड येथील व्यासपीठावर कोळी बांधवांनी पालखीचे विधीवत पूजन केले. समुद्राला अर्पण होणाऱ्या नारळाचे पूजन करून पालखीची मिरवणूक वाजतगाजत कळवा विसर्जन घाटापर्यंत काढण्यात आली. घाटावर पालखीची पुन्हा पूजा करून नारळ कळवा खाडीत अर्पण करण्यात आला.


नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा पारंपरिक सण असून, दर्याला नारळ अर्पण करून मासेमारी हंगामाची सुरुवात केली जाते. दरवर्षी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून हा उत्सव साजरा केला जातो. याबद्दल कोळी बांधवांनी महापालिकेचे आभार मानले. उत्सवानिमित्त पारंपरिक कोळी नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे वातावरणात सणाची उत्साहपूर्ण लहर निर्माण झाली. 




मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील गावांमध्ये आज सकाळपासूनच उत्सवाचे वातावरण होते. पारंपरिक वेशभूषेत सजलेले कोळी बांधव आणि भगिनी वाजत-गाजत मिरवणुका काढून समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले. पारंपरिक कोळीगीतांवर नाचत आणि समुद्राची मनोभावे पूजा करून त्यांनी नव्या हंगामासाठी आशीर्वाद मागितले.

ठाण्यातील कळवा येथे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कोळी बांधवांनी पालखीचे पूजन करून मिरवणूक काढली आणि कळवा खाडीला नारळ अर्पण केला. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि पारंपरिक कोळी नृत्यांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे उत्सवाच्या उत्साहात आणखी भर पडली.

हा सण केवळ धार्मिकच नाही, तर मच्छीमार बांधवांच्या उपजीविकेच्या नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा दिवस एखाद्या मोठ्या सणापेक्षा कमी नसतो.





Post a Comment

Previous Post Next Post