डोंबिवलीत भरली बिना दप्तराची शाळा

 विद्यार्थ्यांना वहीपुस्तकाशिवाय शिक्षणाचा आनंद 

   डोंबिवली ( शंकर जाधव ) :  शाळेत चाललोय पण दप्तर नाही असा एक दिवस तरी आठवतो का ? नाही ना. नेहमी दप्तराचे ओझे घेत शाळेत निघालेले विद्यार्थी अचानक शाळेत दप्तर घेऊन जात नाही हे पाहून पालकांना आश्चर्य वाटले. पण आज आमच्या शाळेत बिना दत्पराची शाळा भरणार असे विद्यार्थ्यानी सांगताच पालकही खुश झाले.

डोंबिवलीच्या टिळकनगर बाल विद्यामंदिरामध्ये काल २७ जुलै रोजी नवीन शैक्षणिक धोरणानुसार बिना दप्तराची शाळा हा उपक्रम राबविण्यात आला. बिना दप्तराच्या शाळेत विद्यार्थी खूप उत्साही व आनंदी होते. दिवसभरात कोणत्याही प्रकारचा पाठांतर,लेखनाचा अभ्यास मुलांनी केला नाही. फक्त खेळातून आणि कृतीतून ज्ञानार्जन केले.बिनादप्तराची शाळा या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना व शिक्षकांना खूप छान अनुभव मिळाला.हा उपक्रम मुलांना वही पुस्तका शिवाय शिक्षणाचा आनंद दिला.

    


या उपक्रमात पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्लिश शब्दांच्या भेंड्या, अक्षरकार्डच्या आधारे शब्द बनवणे अश्या भाषिक कृती तसेच मणी, काडेपेटीतील काड्या यांच्यावर आधारलेल्या खेळातून हसत खेळत दशक-एकक संकल्पना दृढ करण्यात आल्या. संख्याकार्डाच्या आधारे संख्याची ओळख व वाचन विद्यार्थ्यांनी केले. दोरा, रंगीत कागद वापरून भौमितिक आकारही तयार केले. विद्यार्थी निर्भिडपणे बोलवे,त्यांनी त्यांचे विचार स्पष्ट मांडावे आणि फळांची ओळख व्हावी या करीता प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक फळ देऊन त्याच्याविषयी बोलण्यास प्रवृत्त्त करण्यात आले.      

     पहिलीतल्या मुलांनी फळांचे आकार,रंग,चव या विषयीची माहिती सांगितली. तसेच चौथीच्या विद्यार्थ्यांनी छोट छोटे प्रयोग प्रत्यक्ष करून अनुभव घेतला.चौथीच्या विद्यार्थ्यांनी ओव्या, भारुडे सादर केली. विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुदृढतेकरिता व्यायाम, कवायत व मूल्यसंस्कारां करीता गोष्टी सांगण्यात आल्या. टिळकनगर बाल विद्यामंदीराच्या मुख्याध्यापिका विजया निरभवणे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर सर्व शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे बिना दप्तराची शाळा हा उपक्रम मुलांना वही पुस्तका शिवाय शिक्षणाचा आनंद दिला. या उपक्रमास संस्थेच्या कार्यवाह अर्चना जोशी, सदस्या नितेश्री काबाडी, रूपाली साखरे यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.



Post a Comment

Previous Post Next Post