डोंबिवली / शंकर जाधव : कचोरे ग्रामस्थ मंडळ, कचोरे कोळीवाडा यांच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सव २०२५ मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. कोळी समाजाच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवणारी ही मिरवणूक शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी कचोरे कोळीवाडा चौक ते कचोरे खाडीपर्यंत वाद्यांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत काढण्यात आली.
या लोकोत्सवासाठी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. आमदार मोरे यांनी मिरवणुकीत पारंपरिक पद्धतीने सहभागी होत ग्रामस्थांशी संवाद साधला आणि सर्वांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला आमदार राजेश मोरे यांच्यासह माजी नगरसेविका रेखा चौधरी, राजन चौधरी, बजरंग दलाचे अध्यक्ष मनोज चौधरी, गजानन व्यापारी (उपशहर संघटक), उमेश (बाळा) शेलार, सुनील पवार आणि रोहित रोहिदास म्हात्रे यांसारख्या अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घेतला.या उत्सवाच्या निमित्ताने कचोरे कोळीवाड्यात परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेचा एक सुंदर संगम पाहायला मिळाला. कोळी बांधवांनी दर्याला नारळ अर्पण करून नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात केली आणि वरुण देवतेकडे सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली.
Post a Comment