
वाहतूककोंडी फुटणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाटात वारंवार होणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता तीन स्तरांमध्ये रस्त्याचे बांधकाम केले जाणार असून, त्यामुळे हा रस्ता अधिक मजबूत आणि टिकाऊ होईल, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी शनिवारी अचानक या रस्त्याच्या कामांची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.
काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध प्राधिकरणांची बैठक घेऊन घोडबंदर रस्ता खड्डेमुक्त करण्याबाबत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. यानंतर गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी विशेष वाहतूक ब्लॉकही घेण्यात आला आहे.
तीन स्तरांमध्ये होणार रस्त्याची बांधणी
शनिवारी दुपारी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कासारवडवली ते गायमुख दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि इतर अधिकारी उपस्थित होते. शिंदे यांनी सांगितले की, "वारंवार खड्डे बुजवूनही हा रस्ता टिकत नव्हता. त्यामुळे आता तीन दिवसांचा ब्लॉक घेऊन रस्ता खालपर्यंत खोदण्यात आला आहे. सर्वात वरच्या थरात 'वॉटर बाऊंड मॅकॅडम' (WBM), मधल्या थरात 'डेन्स बिटुमिनस मॅकॅडम' (DBM) म्हणजेच डांबर आणि सर्वात खालच्या थरात मास्टिकचे आवरण टाकले जाणार आहे." या तीन-स्तरीय बांधणीमुळे अवजड वाहनांची वाहतूक सहज सहन करण्याची क्षमता रस्त्यात येईल आणि तो अधिक काळ टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रस्त्याच्या बाजूने पाणी जाण्यासाठी विशेष गटार व्यवस्थाही केली जात आहे, जेणेकरून रस्त्यावर पाणी साचणार नाही.
भविष्यात ६० मीटरचा एलिव्हेटेड रस्ता
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भविष्यातील योजनेचीही माहिती दिली. ते म्हणाले की, या ठिकाणी ६० मीटर रुंदीच्या एलिव्हेटेड रस्त्याला मंजुरी देण्यात आली आहे. वनविभागाची परवानगी मिळाल्यानंतर या रस्त्याचे काम सुरू होईल, ज्यामुळे घोडबंदर परिसरातील वाहतूककोंडी कायमची सुटण्यास मदत होईल.
या पाहणी दौऱ्यात त्यांनी घोडबंदरचा संपूर्ण रस्ता वाहतूककोंडीमुक्त करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनीही दोन दिवसांपूर्वी या रस्त्याची पाहणी केली होती. या कामामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम होणार असला तरी, भविष्यात प्रवाशांना खड्डेमुक्त आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळेल, अशी अपेक्षा आहे.
Post a Comment