दिवा \ आरती परब : रक्षाबंधनानिमित्त यंदा दिव्यात एक आगळावेगळा राजकीय रंग पाहायला मिळाला. शिवसेनेतील दोन उपशहर प्रमुख – माजी नगरसेवक शैलेश पाटील आणि भाजपातून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले ॲड. आदेश कमलाकर भगत – यांच्या दरम्यान बहिणींच्या प्रेमाची जणू ‘स्पर्धा’ रंगली.
गेल्या अनेक वर्षांपासून महिलांनी शैलेश पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात राखी बांधण्याची परंपरा कायम ठेवली आहे. तीन वेळा निवडून आलेले आणि महिलांच्या असंख्य प्रश्नांचे निराकरण करणारे पाटील यांच्याकडे आजही मोठा जनसंपर्क आणि विश्वास आहे. "दारात आलेला कोणीही रिकाम्या हाताने परत गेला नाही" ही त्यांची प्रतिमा आहे.
मात्र, यावेळी पहिल्यांदाच ॲड. आदेश भगत यांनाही वारेकर शाळेच्या हॉलमध्ये भागातील महिलांनी राखी बांधून सण साजरा केला. आंदोलने आणि अर्जांच्या माध्यमातून सामान्यांच्या समस्या सोडवणारे भगत यांनी आपल्या पहिल्याच राखी उपक्रमात चांगलाच जनसंपर्क साधला.
या दोन ठिकाणी झालेल्या राखी कार्यक्रमांमुळे नागरिक आणि भगिनींच्या सहभागातून राजकीय वातावरणात उत्सुकता निर्माण झाली असून, निवडणूकीच्या पडघम मध्ये रक्षाबंधनाचा हा सण यंदा दिव्यात ‘भावबंधनाबरोबरच लोकप्रियतेची कसोटी’ ठरला.
Post a Comment