प्रशासनाकडून पुन्हा एकदा आश्वासनाची खैरात
दिवा / आरती परब : दिवा शहरातील शांतीनगर परिसरात गेल्या सात-आठ महिन्यांपासून पाण्याची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने येथील रहिवासी, विशेषतः महिलावर्ग, प्रचंड त्रस्त झाला आहे. या समस्येवर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी शांतीनगरमधील महिलांनी भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सपना रोशन भगत यांची भेट घेतली होती.
या तक्रारीची दखल घेत, सपना भगत यांनी काही दिवसांपूर्वी दिवा प्रभाग समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे उप-अभियंते सुरेश वाघिरे यांना निवेदन दिले होते. त्यावेळी वाघिरे यांनी लवकरच चौकशी करून पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पंधरा दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये आणि महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर, सपना भगत यांनी शांतीनगर परिसरातील महिलांना सोबत घेऊन थेट प्रभाग समिती कार्यालय गाठले आणि अधिकारी वाघिरे यांना या विलंबाबद्दल जाब विचारला. यावेळी वाघिरे यांनी पुन्हा एकदा येत्या दोन दिवसांत पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.
दिव्यातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होत असल्याने नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येमुळे नागरिक हैराण झाले असून, महिलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे शांतीनगर परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, वेळेत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
उल्लेखनीय आहे की, स्वच्छ पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असल्याचे मत उच्च न्यायालयाने यापूर्वीच नोंदवले आहे. तसेच, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तातडीने बैठक बोलावण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. असे असतानाही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने नागरिकांचा असंतोष वाढत आहे.
Post a Comment