महिला खेळाडूंसाठी हक्काचे व्यासपीठ
जळगाव: येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ASMITA फुटबॉल लीग 2025-26 ला उत्साहात प्रारंभ झाला आहे. महिला क्रीडा क्षेत्रातील नवोदित आणि प्रतिभावान खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 'खेलो इंडिया' अंतर्गत या लीगचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री, खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी खेळाडूंशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहन दिले. "ही लीग केवळ एक स्पर्धा नाही, तर महिला खेळाडूंसाठी, विशेषतः आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजातील युवतींसाठी आपले कौशल्य दाखवण्याचे एक मोठे व्यासपीठ आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले. अडथळे दूर करून महिला खेळाडूंना मुख्य प्रवाहात आणणे हे या उपक्रमाचे ध्येय असल्याचेही त्या म्हणाल्या.
ASMITA (Achieving Sports Milestone by Inspiring Women Through Action) या उपक्रमाचा भाग म्हणून १३ वर्षांखालील मुलींसाठी ही फुटबॉल लीग आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या लीगचे आयोजन करण्यात येणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी केतकी पाटील आणि जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारुख शेख यांच्यासह महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.'सबका साथ, सबका विकास' या धोरणानुसार, ही लीग महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
Post a Comment