ठाणे स्थानकाच्या विस्तारकामाला गती

 



१५ डब्यांच्या लोकलसाठी जलद गतीने स्थानकाचा विस्तार 

ठाणे : मध्य रेल्वेवरील सर्वाधिक वर्दळीच्या ठाणे स्थानकावर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने स्थानक विस्ताराचे काम हाती घेतले आहे. विशेषतः स्लो लाईनवरील ३ व ४ क्रमांकाच्या स्थानकाचा विस्तार जलद गतीने सुरू असून, लवकरच या दोन्ही प्लॅटफॉर्मवर १५ डब्यांच्या लोकल गाड्यांना थांबा देता येईल.


सध्या या दोन्ही प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्याने, १५ डब्यांच्या लोकल गाड्या पूर्णपणे थांबविणे शक्य होत नव्हते. परिणामी शेवटच्या डब्यांतील प्रवाशांना चढण्या-उतरण्यात अडचण येत होती. या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा म्हणून रेल्वेने प्लॅटफॉर्म वाढविण्याचे आणि पायाभूत सुधारणा करण्याचे काम सुरू केले आहे.




कामाच्या ठिकाणी सध्या स्लीपर ब्लॉक्स बसविणे, ट्रॅक लेव्हलिंग, प्लॅटफॉर्म उंचावणे आणि नवीन फरशी टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कामासाठी रेल्वेने कामगारांची विशेष पथके नियुक्त केली असून, दिवसरात्र काम चालू ठेवून प्रवासी हालचालीवर परिणाम होऊ नये, याची विशेष खबरदारी घेतली जात आहे.


ठाणे स्थानक हे मध्य रेल्वेवरील अत्यंत महत्त्वाचे जंक्शन असून, सेंट्रल आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील लाखो प्रवासी दररोज या स्थानकातून प्रवास करतात. त्यामुळे या विस्तारकामामुळे गर्दीचे व्यवस्थापन सुकर होईल, तसेच प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि सुलभ प्रवास अनुभवता येईल, अशी अपेक्षा आहे. “ठाणे स्थानकावरील विस्तारकाम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे. १५ डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा उभारल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 






Post a Comment

Previous Post Next Post