परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन उद्या, ११ ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. प्रशासकीय प्रक्रियेत झालेला विलंब आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे यंदा वेतनाला काहीसा विलंब झाला. याबाबतची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन साधारणपणे दर महिन्याला ७ तारखेला, तर काही वेळा ७ ते १० तारखेच्या दरम्यान अदा केले जाते. मात्र, यावेळी शासनाकडून एसटी महामंडळाला विविध शासकीय सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी मिळणारी रक्कम वेळेत प्राप्त न झाल्याने वेतन वितरणावर परिणाम झाला.
एसटी महामंडळाकडून शासनाच्या विविध सवलतींच्या प्रतिपूर्तीच्या रकमेची माहिती दर महिन्याला वित्त विभागाकडे नियमितपणे सादर केली जाते. जुलै महिन्याची माहितीही महामंडळाने वेळेत सादर केली होती. मात्र, प्रतिपूर्तीची रक्कम प्राप्त होण्यास झालेला विलंब तसेच सलग सुट्ट्यांमुळे प्रशासकीय प्रक्रियेला वेळ लागला.
कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत मिळावे यासाठी वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी औपचारिकतेची वाट न पाहता वारंवार थेट संपर्क साधून पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्यानंतर शासनाकडून प्रतिपूर्तीच्या रकमेबाबतचा निर्णय आज प्राप्त झाला असून, त्यानुसार ११ ऑगस्ट रोजी सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जुलै महिन्याचे वेतन जमा करण्यात येणार आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
दरम्यान, यापुढे वेतन वितरणात कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
वेतनाला विलंब झाल्यास त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर होतो. बँकेचे कर्जाचे हप्ते वेळेत भरता न आल्यास अतिरिक्त व्याज किंवा दंडाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या या अडचणी गांभीर्याने घेऊन भविष्यात एसटी प्रशासन आणि शासनाच्या वित्त विभागाने अधिक प्रभावी समन्वयाने काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. भविष्यात अशा प्रकारचा विलंब होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक ती दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
