१०४ अंशांपर्यंत ताप असतानाही पाच दिवस शूटिंग
मुंबई : अभिनेत्री अविका गौरला डेंग्यूची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिचे पती मिलिंद चंदवाणी यांनी शुक्रवारी रात्री सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत अविकाच्या प्रकृतीची माहिती दिली. गेल्या पाच दिवसांपासून १०३ ते १०४ अंश ताप असतानाही अविका व्यावसायिक बांधिलकी पूर्ण करण्यासाठी शूटिंग करत होती, असे त्यांनी सांगितले.
मिलिंद यांनी सांगितले की, अविकाची प्रकृती खालावल्यानंतर तिला गुरुवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीही तिने तापाची पर्वा न करता काम सुरू ठेवले होते. दोन दिवसांचे नियोजित शूटिंग तिने केवळ एका दिवसात पूर्ण केले. तिच्या कौशल्यामुळे हे शक्य झाल्याचे मिलिंद यांनी सांगितले.
शूटिंगनंतर घरी परतून औषधे घेतल्यानंतर मिळालेल्या अल्प विश्रांतीत तिने दिल्लीला जाऊन जाहिरातीचे शूटिंगही पूर्ण केले. शूटिंग पुढे ढकलल्यास निर्मात्यांचे आर्थिक नुकसान होईल, या विचाराने तिने काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीला जाण्यापूर्वी तिने आवश्यक चाचण्या करून घेतल्या होत्या आणि कोणत्याही विषाणूचा संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच ती शूटिंगसाठी गेली होती.
“मी तिला अनेकदा सांगितले की निर्माते परिस्थिती समजून घेतील, शूटिंग पुढे ढकल. मात्र, तिचे म्हणणे होते की कोणाचा तरी वेळ आणि कोणाचे तरी पैसे खर्च होतील. मला शक्य तितके काम करायचे आहे,” असे मिलिंद यांनी सांगितले.
अविकाच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेचे कौतुक करताना मिलिंद यांनी तिच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचे वर्णन प्रेरणादायी असे केले. कामासोबतच इतरांच्या वेळेचा आणि संसाधनांचा आदर करण्याची तिची वृत्ती उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अविकाने रुग्णालयातील काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. एका छायाचित्रात ती रुग्णालयाच्या बेडवर हसताना आणि विजयाची खूण करताना दिसत आहे. “प्लेटलेट्सच्या संख्येशिवाय आज मला उत्साहित ठेवणारी एकमेव गोष्ट म्हणजे ‘बुखार’ हे माझे नवीन गाणे आज संध्याकाळी ६ वाजता प्रदर्शित होत आहे,” असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच डेंग्यूच्या त्रासाबद्दलही तिने मिश्कीलपणे प्रतिक्रिया दिली.
दुसऱ्या छायाचित्रात तिच्या हाताला उपचारासाठी सलाईन लावण्यात आल्याचे दिसत आहे. प्रकृतीतून सावरत असतानाही तिने चाहत्यांशी संपर्क कायम ठेवला आहे.
अविका गौरने बालकलाकार म्हणून ‘बालिका वधू’ या लोकप्रिय मालिकेत आनंदीची भूमिका साकारत प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर ‘ससुराल सिमर का’ यांसारख्या मालिकांमधून तिने प्रेक्षकांची मने जिंकली. पुढे तिने तेलुगू आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली कारकीर्द विस्तारली.
