तपोवन विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस
मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर येथील तपोवन विद्यालयात एका विद्यार्थ्याने जेवणाच्या डब्यात मेथीची भाजी आणल्याने त्याला ५० रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या कारवाईमुळे पालकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, शाळेच्या आहारविषयक नियमांवरून वाद निर्माण झाला आहे.
पर्युषण पर्व २०२६च्या पार्श्वभूमीवर शाळेने विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत काही निर्बंध लागू केले होते. या शाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी जैन समाजातील असल्याने प्रवेशाच्या वेळीच मुलांच्या डब्यात मांसाहारी पदार्थ किंवा कंदमुळे न देण्याच्या सूचना पालकांना करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, याच नियमाचा आधार घेत विद्यार्थ्याने डब्यात मेथीची भाजी आणल्याने त्याच्यावर ५० रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचे समोर आले आहे.
या प्रकाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी रॉबर्ट डिसोझा यांनी पालिकेकडे अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने तपोवन विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
डब्यात कोणते अन्न आणावे यावर निर्बंध घालणे तसेच विशिष्ट पदार्थ आणल्याबद्दल विद्यार्थ्याकडून दंड वसूल करणे याबाबत शिक्षण विभागाने शाळेकडून स्पष्टीकरण मागवले आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांसह शिक्षण विभागाच्या संबंधित नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचीही दखल नोटीसमध्ये घेण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे शाळांमधील आहारविषयक नियम आणि त्यांची अंमलबजावणी यावर चर्चा सुरू झाली आहे. आता तपोवन विद्यालयाकडून मिळणाऱ्या स्पष्टीकरणानंतर शिक्षण विभागाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
