१,४०० विद्यार्थ्यांचा प्रश्न आमदार संजय केळकरांकडे
दिवा \ आरती परब : दिवा पश्चिम येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक ९८/७९ मध्ये गेल्या १८ महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या कायम असून, शाळेतील सुमारे १,४०० विद्यार्थ्यांना पाण्याअभावी गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या घरुन २ ते ३ बाटल्या पाणी न्यावे लागत आहे. एप्रिल २०२५ पासून शाळेतील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद असल्याचे समोर आले आहे. या गंभीर समस्येची दखल भाजपचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी घेतली असून, संबंधित प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेत दीर्घकाळ पाणीपुरवठा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा, स्वच्छतेचा आणि दैनंदिन गरजांचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीही शाळेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. तरीही समस्या कायम असल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणी आशा भोरे यांनी आमदार संजय केळकर यांना निवेदन देऊन शाळेतील पाणीटंचाईकडे लक्ष वेधले होते. विद्यार्थ्यांना पिण्यास पाणी नाही, हात धुण्यास पाणी नाही, बाथरुमला ही पाणी नाही असे पालकांना त्यावेळी सांगितले. तसेच दिवा भाजपच्या वतीने विजय भोईर आणि सतीश केळशीकर यांनीही हा प्रश्न आमदार केळकर यांच्याकडे मांडला. यावेळी विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.
शाळेत सुमारे १,४०० विद्यार्थी शिक्षण घेत असताना पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत सुविधा तब्बल १८ महिन्यांपासून उपलब्ध नसणे ही गंभीर बाब आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष वेधल्यानंतर आता ठाणे महानगरपालिका प्रशासन किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि दैनंदिन वापरासाठी स्वच्छ पाण्याची सुविधा तातडीने उपलब्ध करून देऊन हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी होत आहे.
