दसरा मेळाव्याच्या दिवशी शेतकरी कुटुंबांसाठी दिवाळीचा शिधा पाठवणार; मुलींच्या विवाहासाठीही मदतीची घोषणा
डोंबिवली \ शंकर जाधव : दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असून, त्यांना या कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप, शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत आणि दसरा मेळाव्याच्या दिवशी शेतकरी कुटुंबांसाठी दिवाळीचा शिधा पाठविण्याची घोषणा त्यांनी केली.
डोंबिवलीतील डीएनसी शाळेच्या मैदानावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्रोत्सवाला शनिवारी भेट दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेतले आणि उपस्थितांशी संवाद साधला. दुष्काळाचे संकट दूर होऊन बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना त्यांनी देवीचरणी केली.
दांडियाऐवजी भक्तिसंगीत; मदतनिधी शेतकऱ्यांसाठी
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून डोंबिवलीत या नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा पारंपरिक दांडियाऐवजी भजनसंध्या, संगीत कार्यक्रम आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांवर भर देण्यात आला आहे. दांडिया उत्सवासाठी वापरला जाणारा निधी दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे.
दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे, असे शिंदे यांनी सांगितले. शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना रोजगाराचे साधन मिळेल आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावता येईल. तसेच, शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठीही शिवसेनेच्या वतीने मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दसरा मेळाव्याच्या दिवशी दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी कुटुंबांसाठी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे अनेक ट्रक रवाना करण्यात येतील. या माध्यमातून संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
“महाराष्ट्र ही संतांची आणि कष्टकऱ्यांची भूमी आहे. आपल्या राज्याला समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा वारसा लाभला आहे. भक्तिगीते, भजने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा वारसा जपण्याबरोबरच तो पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न अशा उत्सवांमधून केला जातो. अशा उपक्रमांमुळे समाज एकत्र येतो आणि नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख होते,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे मतदारसंघातील विकासकामांसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांतूनही समाजाशी जोडलेले आहेत. परंपरा जपणारे आणि सांस्कृतिक वारसा वृद्धिंगत करणारे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे सांगत शिंदे यांनी या नवरात्रोत्सवाच्या आयोजनाबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
मदतनिधीसाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मदतनिधीचे धनादेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. शेतकरी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आणि ग्रामीण जीवनाचा कणा आहे. त्याच्यावर संकट ओढवल्यानंतर त्याला आधार देणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी देवीचरणी गाऱ्हाणे
डोंबिवलीतील शारदीय नवरात्रोत्सवात यंदा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. दुष्काळाचे संकट दूर होऊन बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी आणि शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळावा, यासाठी मालवणी भाषेत देवीचरणी गाऱ्हाणे घालण्यात आले. कोकणच्या लोकपरंपरेतून व्यक्त झालेली ही प्रार्थना उपस्थितांच्या मनाला भावली. या उपक्रमातून शेतकऱ्यांच्या वेदनांशी जोडलेली सामाजिक संवेदनशीलता आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडले.



