कोकणीपाडा जलउदंचन केंद्राच्या कामाला गती देण्याच्या सूचना

 


शिवाईनगर, रामबाग परिसरातील कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा

ठाणे : प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी कोकणीपाडा येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन जलउदंचन केंद्राच्या कामाची नगरसेवक सिताराम (बाजी) राणे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेत उर्वरित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

या जलउदंचन केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर शिवाईनगर, रामबाग आणि लगतच्या परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अपुऱ्या व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा निघण्यास मदत होणार आहे. प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून कामाला गती देण्याचे निर्देश राणे यांनी दिले.

यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल कुळकर्णी, कनिष्ठ अभियंता संकेत कदम, संबंधित ठेकेदार आणि विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, दिवाळीनंतर पाणीपुरवठा विभागासह संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी, तांत्रिक अडचणी, पाण्याचा दाब आणि वितरण व्यवस्था यांचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही निश्चित केली जाणार आहे.

प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी पोहोचावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे नगरसेवक सिताराम (बाजी) राणे यांनी सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post