पर्यटन आणि रोजगाराला मिळणार नवी गती; पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही; विमानसेवा अखंड सुरू ठेवण्याचा निर्धार
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देणारी आणि जिल्हावासीयांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाली आहे. चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर फ्लाय ९१ कंपनीच्या विमानसेवेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात मुंबईहून आलेल्या प्रवाशांचे पुष्पवृष्टी, औक्षण आणि मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच मुंबईकडे रवाना होणाऱ्या पहिल्या प्रवाशाला बोर्डिंग पास देण्यात आला.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा भविष्यात अखंड सुरू राहील, अशी ग्वाही दिली. ही सेवा केवळ प्रवासाची सुविधा नसून जिल्ह्याच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर अग्रस्थानी आणणे, स्थानिक तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि जिल्ह्याची आर्थिक प्रगती साधणे हे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी विविध तांत्रिक अडचणी दूर करण्यासह धावपट्टी, वेळेची मर्यादा, रस्ते आणि रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याच्या सुविधांवर काम करण्यात आले. त्यामुळे भविष्यात मोठ्या विमान कंपन्यांनाही या विमानतळावरून सेवा सुरू करणे शक्य होणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
लहान शहरांमधील विमानसेवा टिकवून ठेवण्यासाठी विमान कंपन्यांना शासनाच्या आर्थिक पाठबळाची आवश्यकता असते. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने सिंधुदुर्ग विमानतळासाठी विशेष प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे विमानसेवा सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे त्यांनी नमूद केले.
विमानतळामुळे जिल्ह्यात पर्यटनपूरक व्यवसायांना मोठी संधी निर्माण होणार आहे. पर्यटकांसाठी टुरिस्ट गाड्या, हॉटेल व्यवसाय, पर्यटन मार्गदर्शन आणि अन्य सेवा स्थानिक तरुणांच्या मालकीच्या असाव्यात. या संधींचा लाभ बाहेरील व्यावसायिकांपेक्षा जिल्ह्यातील तरुणांना मिळावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला उत्पन्नाच्या बाबतीत राज्यातील पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आमदार नीलेश राणे यांनी विमानसेवा पुन्हा सुरू करणे हे आव्हानात्मक काम असल्याचे सांगितले. मुंबई, नवी मुंबई आणि गोव्यातील मोपा विमानतळांमुळे निर्माण झालेली स्पर्धा आणि तांत्रिक अडचणी असतानाही पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रयत्नपूर्वक विमानसेवा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार दीपक केसरकर यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. मुंबई ही कोकणासाठी महत्त्वाची जोडणी असून, दोन वर्षांनंतर ही सेवा पुन्हा सुरू होणे आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत ही सेवा सुरू होत असून, विमान तिकिटाच्या दरात शासनाकडून सुमारे तीन हजार रुपयांचे अनुदान दिले जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही विमानप्रवासाचा लाभ घेता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार नीलेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.


