- पुन्हा अव्वल स्थान पटकावण्याची संधी
हैदराबाद : इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल)मध्ये हैदराबाद एफसी पुन्हा एकदा अव्वल क्रमांकावर झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या मुंबई सिटी एफसी केवळ दोन गुणांच्या फरकाने पहिल्या क्रमांकावर आहेत. गतविजेत्यांना गुरुवारी हैदराबादच्या जीएमसी बालयोगी स्टेडियमवर प्ले ऑफच्या शर्यतीत येण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या चेन्नईयन एफसीचा सामना करावा लागणार आहे. हैदराबाद एफसी घरच्या मैदानावर विजय मिलवतील असा विश्वास आहे, परंतु चेन्नईयन आता प्रत्येक सामन्यात संधीचं सोनं करण्याच्या निर्धारानेच उतरणार आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात हैदराबाद एफसीने ३-१ अशा फरकाने एफसी गोवाचा पराभव करून सलग पाचवा विजय नोंदवला. गतविजेत्यांनी मागील पाच सामन्यांत १७ गोल केले आहेत, तर प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्या विरोधात केवळ ३ गोल करता आले आहेत. मुख्य प्रशिक्षक मॅनोलो मार्क्यूझ यांनी खेळाडूंच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला आहे आणि प्रमुख स्ट्रायकर बार्थोलोमेव ऑग्बेचे याचा परतलेला फॉर्म पाहून ते सुखावले आहेत. ३८ वर्षीय ऑग्बेचेने एफसी गोवाविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक नोंदवली होती. यंदाच्या पर्वातील ही त्याची पहिलीच हॅटट्रिक ठरली, तर आयएसएल इतिहासात सर्वाधिक ४ हॅटट्रिकचा विक्रम त्याच्याच नावावर आहे.
नायजेरियाच्या ऑग्बेचेने १३ सामन्यांत आता ६ गोल केले आहेत आणि यंदाच्या पर्वात सर्वाधिक गोल करणाऱ्या क्लेईटन सिल्वा व जॉर्ज डिएझ यांच्यापेक्षा त्याच्या खात्यात दोन गोल कमी आहेत. विंगर हलिचरण नार्झरी यानेही चांगला प्रभाव पाडला आहे. त्याच्या नावावर पाच गोल सहाय्य आहेत. ''चेन्नईयन एफसी चांगला संघ आहे आणि सध्या त्यांना प्रत्येक सामना जिंकायचा आहे. कारण, हे प्ले ऑफसाठीच्या सहाव्या क्रमांकाच्या जवळ आहेत व त्यांच्याहातात एक अतिरिक्त सामना आहे. विजयासाठी आता ते कोणताही धोका पत्करण्यास तयार आहे. मला त्यांची शैली आवडते,''असे मार्क्यूझ म्हणाले. ते पुढे म्हणाले,''या पर्वाच्या पहिल्या टप्प्यात आम्ही ऑग्बेचेच्या गोलला मिस केले. पण, आता त्याचा फॉर्म परतला आहे.''
मागील आठवड्यात चेन्नईयन एफसीने नाट्यमय सामन्यात जमशेदपूर एफसीला २-२ असे बरोबरीत रोखले होते. चेन्नईयन एफसीला सलग तीन सामन्यांत विजय मिळवता आलेला नाही. त्यांनी दोन सामने ड्रॉ राखले आहेत, तर एकमध्ये पराभव झाला आहे. व्हिन्सी बारेट्टोने मागील सामन्यात चेन्नईयन एफसीला पुनरागमन करून दिले. त्यानंतर पीटर स्लिस्कोव्हिचने बरोबरीचा गोल केला. चेन्नईयनने मागील सामन्यात विजय मिळवला असता तर त्यांच्या व सहाव्या क्रमांकामधील अंतर दोन गुणांचेच राहिले असते. ते सध्या एफसी गोवापेक्षा चार गुणांनी पिछाडीवर आहे.
मुख्य प्रशिक्षक थॉमस ब्रॅडरिच हे एका सामन्याच्या निलंबनाच्या कारवाईनंतर उद्याच्या लढतीत पुनरागमन करणार आहेत. पण, त्यांना मुख्य खेळाडू एब्देनासेर अल खयाती याच्याशिवाय खेळावे लागणार आहे. तो अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. ''आम्ही कमबॅक केले आहे, परंतु आम्ही जमशेदपूर एफसीविरुद्धची लढत वारंवार पाहिली आणि त्यातून हैदराबादविरुद्धच्या सामन्याची आम्ही तयारी केली आहे. उद्याचा सामना आव्हानात्मक असेल, परंतु आम्ही त्यासाठी सज्ज आहोत. आम्हाला काही उणीवा दूर करायच्या आहेत. अल खयाती चेन्नईला परतला आहे आणि तो दुखापतीतून सावरतोय,''असे ब्रॅडरिच यांनी सांगितले.
यंदाच्या पर्वात दोन संघ समोरासमोर आले होते आणि त्यात हैदराबादने ३-१ असा विजय मिळवला होता. हिरो आयएसएलमध्ये उभय संघांत सात सामने झाले आहेत आणि दोघांनी प्रत्येकी तीन विजय मिळवले आहेत. एक सामना ड्रॉ राहिला.
Tags
क्रिडा
