आयटेलचा ‘टफ’ फीचर फोन लॉन्च

 


धूळ, पाणी आणि पडण्याची चिंता नाही

मुंबई : शेत, बांधकामाच्या जागा, वर्कशॉप तसेच इतर आव्हानात्मक मैदानी वातावरणात काम करणाऱ्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन आयटेलने ‘आयटेल टफ’ हा नवीन रग्ड फीचर फोन बाजारात आणला आहे. मजबूत बांधणी, २ मीटरपर्यंत ड्रॉप प्रोटेक्शन आणि आयपी५४ डस्ट व वॉटर रेझिस्टन्स यामुळे हा फोन विशेषतः कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी तयार करण्यात आला आहे. फोनसोबत शॉक आणि डस्टप्रूफ सिलिकॉन कव्हर तसेच यूएसबी टाइप-सी चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.

‘रियल भारत का टफ फोन’ या संकल्पनेवर आधारित या फोनमध्ये टिकाऊपणासोबत दैनंदिन वापरासाठी उपयुक्त अशी विविध वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे कामगार, आउटडोअर क्षेत्रातील कर्मचारी तसेच सतत प्रवास करणाऱ्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून फोनची रचना करण्यात आली आहे.

‘आयटेल टफ’चे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील विशेष ‘ॲग्री बटण’. या बटणाच्या माध्यमातून कृषीविषयक माहिती आणि मदतीसाठी संबंधित सरकारी हेल्पलाइनवर एका टचमध्ये संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आणि शेतीशी संबंधित वापरकर्त्यांना आवश्यक माहिती मिळवणे अधिक सोपे होईल, असा कंपनीचा दावा आहे.

कमी प्रकाशाच्या परिस्थितीत वापरासाठी फोनमध्ये ड्युअल-लॅम्प टॉर्च देण्यात आली आहे. शेतात रात्रीच्या वेळी जाणे, बाहेरील काम करणे किंवा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर प्रकाशाची गरज भासणे अशा परिस्थितीत ही टॉर्च उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय गोंगाटाच्या वातावरणातही कॉल आणि ऑडिओ स्पष्टपणे ऐकू यावा यासाठी ‘सुपर साऊंडबॉक्स’ देण्यात आला आहे.

फोनमध्ये ‘किंग व्हॉइस’ हे वैशिष्ट्यही आहे. त्याद्वारे इंग्रजी आणि हिंदी भाषेतील मेसेज, मेनू तसेच येणारे कॉल मोठ्याने वाचून दाखवले जातात. त्यामुळे फोन हाताळताना स्क्रीनकडे वारंवार पाहण्याची गरज कमी होते आणि दैनंदिन वापर अधिक सुलभ होतो.

आयटेलच्या ‘इनो’ मालिकेअंतर्गत हा फोन सादर करण्यात आला आहे. यापूर्वी या मालिकेत कंपनीने ‘आयटेल ॲक्वा’ हा आयपी६७ रेटिंगसह फीचर फोन सादर केला होता. ‘आयटेल टफ’च्या माध्यमातून कंपनीने टिकाऊपणासोबत कृषी आणि आउटडोअर वापरासाठी आवश्यक असलेल्या सुविधांवर अधिक भर दिला आहे.

आयटेल इंडियाचे सीईओ अरिजित तालापात्रा यांनी सांगितले की, भारतातील लाखो नागरिक धूळ, उष्णता, दीर्घ कामाचे तास आणि विविध आव्हानात्मक परिस्थितीत काम करतात. त्यामुळे त्यांच्या वापरातील उपकरणेही त्याच पद्धतीने सक्षम असणे आवश्यक आहे. ‘आयटेल टफ’च्या माध्यमातून फीचर फोनमध्ये टिकाऊपणा आणि प्रत्यक्ष जीवनातील गरजांना अनुरूप कार्यक्षमता एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कंपनीच्या माहितीनुसार, भारतभर आयटेलचे १.३ लाखांहून अधिक रिटेल आउटलेट्स आणि एक हजारांपेक्षा जास्त सर्व्हिस सेंटर्सचे नेटवर्क आहे. तसेच संपूर्ण फीचर फोन पोर्टफोलिओवर मॅन्युफॅक्चरिंग दोषांसाठी एक वर्षाची ‘काउंटर रिप्लेसमेंट गॅरंटी’ देण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि परवडणाऱ्या तंत्रज्ञानावर भर देत फीचर फोन बाजारपेठेत आपले स्थान आणखी मजबूत करण्याचा कंपनीचा प्रयत्न या नव्या लाँचिंगमधून दिसून येतो.



Post a Comment

Previous Post Next Post