रूपाली चाकणकर यांनी घेतली कुटुंबीयांची भेट
पुणे : पुणे जिल्ह्यातील दीप्ती मगर आत्महत्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने ठोस पावले उचलत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज दीप्ती मगर हिच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे सांत्वन केले व आयोग त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा विश्वास दिला.
हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथील विवाहिता दीप्ती मगर चौधरी हिने सासरकडून होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्यावर सातत्याने दबाव टाकला जात असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. तसेच गर्भधारणा झाल्यानंतर मुलगी असल्याचे समजल्यावर जबरदस्तीने गर्भपात करून स्त्री भ्रूणहत्या केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
या घटनेची दखल घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी यापूर्वीच पोलीस उपअधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत विशेष पथक स्थापन करण्याचे आणि आरोपींना तातडीने अटक करून सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते.
मंगळवारी झालेल्या भेटीदरम्यान दीप्तीच्या कुटुंबीयांनी तिला झालेल्या छळाबाबत सविस्तर माहिती दिली. “दीप्तीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोग सर्वतोपरी प्रयत्न करेल,” असे आश्वासन चाकणकर यांनी दिले.
या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाची सद्यस्थितीही आयोगाच्या अध्यक्षा यांनी जाणून घेतली. आयोगाच्या सूचनांनुसार विशेष पथकाने पती रोहन चौधरी व सासू सुनिता चौधरी यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, फरार असलेले सासरे आणि दीर यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच या गुन्ह्यात आणखी कोणती कलमे लागू होऊ शकतात याबाबत तपास करून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या.
या भेटीवेळी यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर पत्की, जिल्हा विधी सल्लागार ॲड. मेघा सोनसळे, पुणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, पुणे उपविभागीय पोलीस अधिकारी दडस, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे तसेच सामाजिक कार्यकर्ते निलेश मगर उपस्थित होते.


