११ ते २७ सप्टेंबरदरम्यान मुंबई-बंगळुरू, मुंबई-गोवा महामार्गासह अटल सेतूवरही सवलत
मुंबई : आगामी गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पुणे तसेच राज्यातील अन्य शहरांतून कोकणातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी जाहीर केला.
सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ तसेच कोकणाकडे जाणाऱ्या अन्य मार्गांवरील टोल नाक्यांवर ही टोलमाफी लागू राहणार आहे.
विशेष म्हणजे, अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांनाही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्याच्या विविध भागांत राहणारे लाखो नागरिक आपल्या मूळ गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जातात. त्यामुळे या काळात महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते. गणेशभक्तांच्या प्रवासाचा खर्च कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ पास आवश्यक
टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी गणेशभक्तांना ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ असा उल्लेख असलेले विशेष स्टिकर किंवा पास घेता येणार आहेत. हे स्टिकर किंवा पास पोलिस ठाणे, वाहतूक पोलिस चौकी तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, हा पास परतीच्या प्रवासासाठीही वैध राहणार आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सव साजरा करून पुन्हा मुंबई, ठाणे, पुणे किंवा इतर शहरांकडे परतणाऱ्या भाविकांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
एसटी बसलाही टोलमाफी
गणेशोत्सवासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून कोकणाकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसनाही टोलमाफी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक कोकणाकडे रवाना होणार असल्याने वाहतूक व्यवस्थेवरही मोठा ताण येण्याची शक्यता आहे. टोलमाफीमुळे भाविकांचा प्रवास काही प्रमाणात सुलभ आणि कमी खर्चाचा होण्याची अपेक्षा आहे.
