- पाच ते सहा महिन्यापासून नागरिकांचे दस्तावेज पोस्ट ऑफिसमध्येच पडून
दिवा : ठाणे पोस्ट कार्यालयाअंतर्गत शिळफाटा नजीक असलेले पडले पोस्ट ऑफिसमधील पोस्टमन हे नागरिकांचे पत्ते शोधण्याची तसदी घेत नसल्याने गेली पाच ते सहा महिने नागरिकांचे पत्र, इतर दस्तावेज पोस्ट ऑफिसमध्येच पडून राहत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पडले गावामध्ये पोस्ट ऑफिस असून शिळगाव, पडले गाव, डायघर गाव, देसाई पाटील पाडा, मोठी देसाई, देसाई वेताळपाडा, खिडकाळी गाव, कल्याण फाटा, शिळ ठाकूरपाडा, भोईर कंपाऊंड, देसाई तळेपाडा, देसाई तांबडीचा पाडा रिव्हर पार्क या गावांतील नागरिकांची पत्रे पडले गावातील पोस्ट ऑफिसमध्ये येत असतात. मात्र पडले गावातील पोस्टमनच्या सुस्ताईमुळे येथील नागरिकांना त्यांची पत्रे तसेच पोस्टाने येणारी इतर महत्वाचे दस्तावेज वेळेवर मिळत नाहीत.
आज घडीला वाहन परवाना, आधार कार्ड, निवडणूक कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, पारपत्र असे महत्वाचे दस्तावेज पोस्टाने पाठवले जातात. मात्र, पडले पोस्ट ऑफिस मधील पोस्टमन योग्य सुविधा देत नसल्याने येथील नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, ठाणे वरिष्ठ पोस्ट कार्यालयाने याची दखल घेऊन पडले गावातील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यश्रम पोस्टमनची नेमणूक करावी अशी मागणी शिळ गावातील सामाजिक कार्यकर्ते विनोद वास्कर यांनी केली आहे.
