रुफटॉप योजनेचा लाभ ग्राहकांनी घ्यावा



  •  महावितरणचे ग्राहकांना आवाहन

भांडूप  : सध्या देशात सौर उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत. केंद्र शासन तसेच राज्य शासनाने सौर उर्जेचा वापर करण्यासाठी ग्राहकांना आवाहन करीत आहे. महावितरणने सुद्धा या कामात हातभार लावण्यासाठी महावितरणची छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा योजना आणली आहे. या योजने अंतर्गत महावितरणच्या ग्राहकांना छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळत आहे. सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत होऊन, नेटमिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाते. अनेक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतले आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी केंद्र शासनाने ‘नेशनल पोर्टल फॉर सोलर रुफटॉप’ चे अनावरण जुलै २०२२ मध्ये केले असून या पोर्टलवर ग्राहक भारतामधून कुठूनही सोलर रुफटॉपसाठी अर्ज करू शकतो.  

सदर योजना ग्राहकांसाठी फायद्याची असून, या योजनेमुळे रोहित्र वरचा ताण ही कमी होतो. या योजनेला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रत्येक मंडळ, विभागीय, उपविभागीय कार्यालय तसेच एजन्सी प्रयत्न करत आहेत. या योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून वित्त सहाय्य देण्यात येत आहे. रुफटॉप सौर योजनेमधून घरगुती ग्राहकांसाठी अटी व शर्तीसह १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येते. तसेच सामुहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था (Group Housing Society) व निवासी कल्याणकारी संघटना (Residential Welfare Association) ग्राहकांना २० टक्के अनुदान देण्यात येते.

महावितरण रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा आस्थापित करण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रति युनिट प्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल. त्याचाही आर्थिक फायदा संबंधीत घरगुती ग्राहकांना होणार आहे. सोबतच सौर यंत्रणा उभारणीच्या खर्चाची साधारणतः ३ ते ५ वर्षात परतफेड होणार आहे. “दरमहा वीजबिलातील आर्थिक बचत तसेच पर्यावरणस्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील वीजग्राहकांनी रुफटॉप सौर ऊर्जा योजनेचा लाभ घेऊन पर्यावरण रक्षणात सहभागी व्हावे.

सुनील काकडे, मुख्य अभियंता,

महावितरण भांडूप परिमंडल

Post a Comment

Previous Post Next Post