५००० हून अधिक महिलांची उपस्थिती
ठाणे शहरातील महिलांसाठी स्वयंरोजगार व व्यवसायिक मार्गदर्शन शिबीर
ठाणे : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 'आरंभ नव्या पर्वाचा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वयंरोजगार व व्यावसायिक मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ५००० हुन अधिक महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात आरंभ गाण्याने मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिजाऊच्या सौ.जुई मरवडे यांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थे कार्याविषयी माहिती दिली. तसेच झडपोलीतील जिजाऊ दिव्यांग मुलांची निवासी शाळा येथील विद्यार्थ्यांनी सुंदर असे गीत सादर केले. तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत ठाणे व पालघर जिल्ह्यात जे काही उपक्रम मोफत राबविले जातात. त्या उपक्रमांविषयीची माहिती व्हिडिओ स्क्रीनिंगद्वारे उपस्थित महिलांना दाखवण्यात आली.
तसेच ठाण्यातील कचऱ्यावरच्या शाळेतील मुलांनी गीत व नृत्य सादर केले. असून त्यांच्या साठी जिजाऊ संस्थेमार्फत मोफत शाळा चालवली जाते. या शाळेतील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी जिजाऊ संस्था कशाप्रकारे त्यांना शिक्षणाची उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे. हे सर्व एका व्हिडिओ स्क्रिनिंग द्वारे उपस्थितांना दाखवण्यात आले. तसेच या कार्यक्रमात ठाण्यातील गरीब, गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात आली.
आज अनेक मान सन्मान आणि प्रतिष्ठेच्या ठिकाणी आपल्याला आजची स्त्री आत्मविश्वासाने वावरताना दिसत आहे. तर एक काळ असा होता की स्त्रिया या फक्त चूल आणि मुल एवढ्यापुरतेच मर्यादित होत्या .घरातील पुरुषाने निर्णय घ्यायचे आणि स्त्रीने फक्त त्या निर्णयाची हो म्हणत अंमलबजावणी करायची एवढेच तिच्या हातात होते. तिला स्वत:ची अशी भूमिका घ्यायची मुभा नव्हती पण आज चित्र वेगळे आहे .
म्हणूच सर्वसामान्य कुटुंबातील स्त्रीयांच्या अंगभूत कला कौशल्यांना वाव मिळावा आणि त्याच्या त्यांच्या उत्कर्षासाठी त्याचा वापर व्हावा या हेतूने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आरंभ नव्या पर्वाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वयंरोजगार व व्यावसायिक मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिजाऊ संस्था ही गेली १४ वर्ष कुठलीही देणगी न घेता स्वकमाईतून शिक्षण, आरोग्य , रोजगार , शेती ,महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती केंद्र या विषयांवर काम करत आहे.
पालघर सारख्या दुर्गम भागात जिथे एकही जिल्हा रुग्णालय नाही अशा ठिकाणी झडपोलीत जिजाऊचे श्री. भगवान महादेव सांबरे रुग्णालय सर्व आरोग्य सेवा मोफत पोहोचवत आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून सर्व आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया अगदी मोफत केल्या जात आहेत .शिक्षणासाठी पालघर जिल्ह्यात 8 सीबीएससी शाळा आहेत. 43 स्पर्धा परीक्षा वाचनालय आहेत ,रोजगार , शेती ,महिला सक्षमीकरण यांवर विविध उपक्रम संस्थेच्यावतीने मोफत चालवले जातात.
तसेच ठाण्यातील डम्पिंग ग्राउंड येथे कचऱ्यावरची शाळा मुलांसाठी चालवली जाते. कचरा वेचून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मुलांना जिजाऊ संस्थेमार्फ़त मोफत शिक्षण दिले जाते.
राजकारण ,अर्थकारण, समाजकारण ,कौटुंबिक जबाबदाऱ्या , सुरक्षा इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया समर्थपणे आपली जबाबदाऱ्या पेलताना दिसत आहेत. मात्र ग्रामीण भागांत आजही या मुख्य प्रवाहापासून आपल्या माता भगिनी या दूर आहेत .म्हणूनच जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण या विषयावर भर देऊन अनेक उपक्रम आपल्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून चालवले जात आहेत. आतापर्यंत ५००० महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या हाताला रोजगार मिळेल असे उपक्रम सक्रियपणे आणि सक्षमपणे राबविले जात आहेत .
पालघर , ठाणे , रायगड , रत्नागिरी व सिंधुदुर्ग या ठिकाणी गृहउद्योगाच्या माध्यमातून लाखो महिलांना भेट देऊन , हजारोंच्या संख्येने महिलांना प्रशिक्षण देऊन गारमेंट फेक्टरी , अगरबत्ती प्रशिक्षण, रिक्षा प्रशिक्षण , महिलांसाठी मेहंदी प्रशिक्षण वर्ग यांसारखे अनेक उपक्रम जिजाऊ संस्थेच्या माध्यमांतून राबवून खऱ्या अर्थाने त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी मदतीचा हात दिला जात आहे.
ठाणे शहरातील महिलांसाठीही अश्याच पद्धतीचे सहकार्य त्यांच्या स्वयंरोजगारासाठी मिळावे या हेतूने आरंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इथल्या माय माऊलीच्या नसानसांत स्वाभिमान आहेच गरज आहे तो फक्त जागृत करण्याची आणि जिजाऊ संस्था नेमके हेच कार्य करत असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
ठाणे येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजीत 'आरंभ नव्या पर्वाचा, ठाण्यातील महिला सक्षमीकरणाचा' या कार्यक्रमाचा निश्चितच खूप चांगला लाभ या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या माझ्या माता-भगिनीना होईल. याची खात्री असल्याचे यावेळी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेशजी भगवान सांबरे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे साहेब, प्रसिद्ध वक्ते शंभु पाटील, संदीप प्रतिष्ठानचे संदीप पाटील, उपयुक्त वर्षा दीक्षित, निलेश (पिंका) पडवळे (नगराध्यक्ष विक्रमगड नगरपंचायत), हेमंत रावसाहेब भानुशाली, गणेश राजपूत, मनोज मरवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
