मराठी रिक्षाचालकांना मनसे आवाहन
दिवा \ आरती परब : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दिवा शहराचे सचिव प्रशांत प्रभाकर गावडे यांनी मराठी रिक्षाचालकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. हिंदी भाषिक रिक्षावाल्यांनी मराठीला विरोध करत रिक्षा बंद पुकारला असून या निर्माण झालेल्या परिस्थितीचा योग्य फायदा घेत, कोणत्याही नागरिकाकडूनही जास्त भाडे न आकारता प्रामाणिकपणे सेवा देत आपली विश्वासार्हता वाढवण्याचे त्यांनी सांगितले.
प्रशांत गावडे म्हणाले की, “ही वेळ मराठी रिक्षाचालकांसाठी आपली कमाई दुप्पट करण्याची आहे. मात्र त्यासाठी प्रवाशांचा विश्वास जिंकणे अत्यंत गरजेचे आहे. जास्तीचे भाडे आकारण्या ऐवजी प्रामाणिक सेवा दिल्यास प्रवासी आपोआप मराठी चालकांनाच प्राधान्य देतील.” तसेच त्यांनी सर्व रिक्षाचालकांना आवाहन केले की, मराठी बांधवांप्रती आपुलकी दाखवत एकमेकांना साथ द्यावी आणि या संधीचा उपयोग करून आपले स्थान अधिक मजबूत करावे.
या आवाहनामुळे स्थानिक रिक्षाचालकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटत असून, प्रवाशांना देखील पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
