नवीन CEO करिश्मा नायर यांचे उत्साहात स्वागत
जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेत शुक्रवारी शाहू महाराज सभागृहात मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा भावपूर्ण निरोप समारंभ तसेच नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी बोलताना मिनल करनवाल यांनी जळगाव जिल्ह्याशी असलेल्या आत्मीय नात्याचा उल्लेख करत सांगितले की, “जळगाव जिल्हा जसा केळी व कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, तसेच येथील माणसेही अत्यंत प्रेमळ आहेत. राज्याच्या कोणत्याही भागात कार्यरत असलो तरी जळगावची माती आणि येथील माणसे कायम स्मरणात राहतील.”
त्यांनी आपल्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देताना सांगितले की, गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेला मिळालेले दोन राज्यस्तरीय पुरस्कार हे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांना यश मिळाले आणि सर्वांनी एकजुटीने, टीमवर्कच्या भावनेतून काम केल्यामुळे जिल्हा परिषदेला नव्या उंचीवर नेता आले, असेही त्यांनी नमूद केले.
“यशाची परंपरा कायम राहील” – करिश्मा नायर
नवनियुक्त CEO करिश्मा नायर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, मिनल करनवाल यांच्या कार्यकाळात जळगाव जिल्हा परिषदेत उल्लेखनीय काम झाले असून अनेक चांगले पायंडे पाडले गेले आहेत. पुढील काळात सर्व अधिकारी, कर्मचारी आणि जनप्रतिनिधी यांच्या सहकार्याने ही यशस्वी परंपरा कायम राखण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, शिक्षणाधिकारी निलेश पाटील, जलसंधारण अधिकारी अमोल पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव, महिला व बालविकास विभागाचे हेमंत भदाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, गटविकास अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, मंजुश्री गायकवाड, ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष संजीव निकम, शिक्षक संघटनेचे संदीप पवार यांसह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी मिनल करनवाल यांना निरोप देताना अधिकारी व कर्मचारी भावुक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
