मुंबई महापालिकेत २२७ वॉर्ड राहणार

उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

मुंबई: मुंबई महापालिका वार्ड रचनेत हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. महाविकास आघाडी सरकारचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलत मुंबई पालिकेची वॉर्ड रचना २२७ ऐवढी केली होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांचे परिसीमन २३६ वरून २२७ वर बदलण्याच्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या दोन माजी नगरसेवकांनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.

शिवसेना माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी याबाबत न्यायलयात आव्हान दिले होते. न्यायालयाने याबाबतचा निकाल राखून ठेवला होता, तो सोमवार जाहीर केला आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता मुंबई मनपा निवडणुकीत फक्त २२७ प्रभाग रचना असणार आहेत. ऑनलाइन सुनावणीवेळी न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे.

न्यायमूर्ती एस बी शुक्रे आणि एम डब्ल्यू चांदवानी यांच्या खंडपीठाने सांगितले की, याचिकांमध्ये काहीही तथ्य आढळले नाही आणि त्यामुळे त्या फेटाळल्या आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी  सरकारने प्रभागांची संख्या २२७ वरून वाढवत २३६ केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post