तातडीने उपाययोजना करण्याचे महापौर यांचे निर्देश
ठाणे : ठाणे शहरातील नालेसफाई कामात विविध प्राधिकरणांच्या विद्युत केबल्स मोठा अडथळा ठरत असल्याचे उघड झाले आहे. या केबल्समुळे नाल्यात कचरा अडकून राहतो आणि पाण्याचा प्रवाह सुरळीत होत नाही. त्यामुळे नाल्यातून गेलेल्या केबल्स एकत्रित करून सुरक्षित ठेवण्यासह नालेसफाईत अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिले.
महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत महापालिका प्रशासन, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, महाराष्ट्र विद्युत पारेषण महामंडळ तसेच टोरंट पॉवर यांच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या. शहरातील नालेसफाई कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतल्यानंतर ही बैठक तातडीने बोलावण्यात आली.
महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी केलेल्या पाहणीदरम्यान नाल्यांमध्ये महावितरण व टोरंट कंपनीच्या केबल्समुळे मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. लोंबकळणाऱ्या केबल्समुळे जेसीबीच्या कामात अडथळा निर्माण होणे, केबल्स तुटण्याचा धोका तसेच नाल्यात उतरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर संबंधित कंपन्यांनी त्यांच्या केबल्सची तातडीने पाहणी करून त्या नाल्याच्या भिंतीलगत किंवा सुरक्षित ठिकाणी एकत्रित कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच भविष्यात नाल्यातील केबल्स भूमिगत करण्याबाबत ठोस नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले.
याशिवाय, भविष्यात नाल्यातून किंवा गटारातून कोणतीही केबल टाकली जाणार नाही, यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले. केबल्स टाकताना महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील, असेही स्पष्ट करण्यात आले. परवानगी न घेता केबल्स टाकणाऱ्या प्राधिकरणांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, भाजप गटनेते मुकेश मोकाशी, उपायुक्त मधुकर बोडके, तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


