वरिष्ठ पोलीस अधिकारी विरोधात घोषणाबाजी
डोंबिवली / शंकर जाधव : भाजपचे डोंबिवलीतील ज्येष्ठ पदाधिकारी नंदू जोशी यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या विरोधात भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. या मोर्चात महिला कार्यकर्त्याही सहभागी झाल्या होत्या.भाजपचे शिष्टमंडळाने सहायक पोलिस आयुक्तांची भेट घेतली असता सदर गुन्ह्याचा तपास पारदर्शकपणे होईल असे आश्वासन दिले.
भाजपचे माजी खासदार जगन्नाथ पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, मनसे शहराध्यक्ष मनोज घरत, भाजपाचे गुलाबराव करजुले, ग्रामीण अध्यक्ष नंदकुमार परब, संदीप माळी, रसिका पाटील, मितेश पेणकर, राजू शेख, मनीषा छल्लारे, अमृता जोशी, प्रतीक्षा पवार, वंदना गोडबोले,वंदना आठवले, हेमलता संत, भारती म्हामणकर, चित्रा माने, वर्षा परमार, रजिता मोरे राधिका मोरे, आदिसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चेकरी पोलीस ठाण्यात येताच त्यांना पोलीस ठाण्याच्या गेटवर बॅरिगेट टाकून अडविण्यात आले. मोर्चेकऱ्यांनी पोलीस ठाण्याचे भारतीय जनता पार्टीचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी पोलीस ठाणे दणाणून सोडले. अखेर शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या या विषयावर चर्चा केली.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे म्हणाले, नंदू जोशी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे. त्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आम्ही सगळे पदाधिकारी मानपाडा पोलीस ठाण्यावर निषेध आंदोलन करण्यासाठी आलो आहोत. खोटे गुन्हे दाखल करून कोणाची बदनामी करू नका, या गुन्ह्यामागे आम्हाला खूप मोठा संशय आहे. यामध्ये षढयंत्र आहे, सर्वपक्षीय कार्यकर्ते आले आहेत. मनसे, भाजपसह सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आमचं म्हणणं आहे की तो गुन्हा रद्द व्हावा. पोलीस ठाण्यात जी वागणूक मिळते ती खूप चुकीची आहे. हा सरकारच्या विरोधात मोर्चा नव्हता, पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाणे विरोधात हा मोर्चा आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे म्हणाले, गुन्ह्यातील सत्यता पडताळून पुढील कारवाई केली जाईल. हा तपास एका महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपविला असून यासंदर्भात योग्य तो तपास केला जाईल. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे म्हणाले, सदर गुन्ह्याचा तपास एका हुशार महिला अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. गुन्ह्याची सत्यता पडताळून पुढील तपास करण्यात येईल असं शिष्टमंडळाला सांगण्यात आले.
या गुन्ह्याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जोशी हे भाजपचे डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष आहेत. तर पीडित महिला ही एका पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आहे. पिडीत महिलेचे पती पोलीस अधिकारी आहेत. दोघांमध्ये वाद सुरू आहे. पोलीस अधिकारी हे जोशी यांचे मित्र आहेत. दरम्यान घर खाली कर, माझे सोबत शारीरीक संबंध ठेव अशा धमक्या देवुन शारीरीक सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित महिलेने जोशी यांच्यावर केला आहे. २०१८ ते एप्रिल २०२३ दरम्यान हा प्रकार घडल्याचे पीडितेने तक्रारीत म्हंटले आहे. तीच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात विनयभंग आणि धमकावणे आदि गुन्हयाखाली जोशीं विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
तर जोशी यांचे म्हणणे आहे की, यामध्ये माझा काहीही संबंध नाही. त्या महिलेला कधीही भेटलेलो नाही. तीला कधी कॉल देखील केलेला नाही. तीचे पती पोलीस अधिकारी आहेत. ते माझे मित्र आहेत. त्या दोघांमध्ये वाद सुरू आहेत. मी तिच्या पतीला मदत करतो असे तीला वाटते. पण माझा काहीही संबंध नाही. माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले गेले आहेत.