IBA-UFBU बैठकीनंतर निर्णय; शनिवारी सुट्टीच्या मागणीवर उच्चस्तरीय समिती
मुंबई : बँक कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून पुकारलेला तीन दिवसांचा देशव्यापी संप पुढे ढकलण्यात आला आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्यात रविवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोमवार ते बुधवार, २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान बँकांचे कामकाज नियमित सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या बैठकीत विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली. त्यानंतर प्रस्तावित संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
बँक कर्मचाऱ्यांना शनिवारी सुट्टी देण्याच्या मुद्द्यावर IBA आणि UFBUची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती या संदर्भातील संभाव्य पर्यायांचा विचार करून चर्चा करणार आहे. बँका, कर्मचारी आणि ग्राहक यापैकी कोणाचीही गैरसोय होणार नाही, असा पर्याय शोधण्याचा प्रयत्न समिती करणार आहे.
PLI योजनेत बदलावर चर्चा
स्केल-IV आणि त्यावरील अधिकाऱ्यांसाठी लागू असलेल्या परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेन्टिव्ह (PLI) योजनेबाबतही बैठकीत चर्चा झाली. कामगिरीशी निगडित वेतनवाढीच्या या योजनेबाबत बँक कर्मचारी संघटनांनी आक्षेप नोंदविले आहेत. त्यामुळे PLI योजनेत बदल करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्याबाबत IBAसोबत चर्चा केली जाणार आहे.
याशिवाय ८ मार्च २०२४ रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तातील इतर प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठीही दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरू राहणार आहे.
संप पुढे ढकलण्यात आल्याने सोमवारपासून बँक शाखांचे कामकाज नियमित सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, संप कायमस्वरूपी रद्द झालेला नसून पुढील चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्याबाबतचा निर्णय होणार आहे.
