दूषित पाणी, अनधिकृत जोडण्यांविरोधात तक्रारी
दिवा | आरती परब
MAHARASHTRA WEBNEWS
दिव्यातील समाधान नगर, जयराम नगर, दादूस नगर, बी. आर. नगर, शंकर मंदिर आणि टाटा पॉवर रोड परिसरात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याच्या समस्येकडे ठाणे महानगरपालिकेने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, याबाबत वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर दिव्यातील नागरिकांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांना निवेदन देऊन पाणीपुरवठ्याची प्रत्यक्ष पाहणी करून समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
समाधान नगर परिसरातील काही ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनमधून सांडपाणी किंवा दूषित पाणी येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पाण्याचे नमुने तपासून दूषित पाण्याचे नेमके कारण शोधावे आणि नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अनधिकृत नळजोडण्यांचा आरोप
मुख्य पाणीपुरवठा वाहिनी तसेच बी. आर. नगर, शंकर मंदिर आणि टाटा पॉवर रोडकडे जाणाऱ्या सब-लाईनवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळजोडण्या असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या जोडण्यांमुळे अधिकृत नळजोडणीधारकांना पुरेशा दाबाने व नियमित पाणी मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
काही अनधिकृत नळजोडण्यांच्या माध्यमातून दरमहा पैसे घेतले जात असल्याची गंभीर तक्रारही निवेदनात करण्यात आली आहे. या आरोपांची स्वतंत्र चौकशी करून त्यात तथ्य आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा इतर दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
टँकरने पाणी विक्रीची तक्रार
मुख्य जलवाहिनीच्या परिसरात दोन वाहनांमधून टँकर भरून पाण्याची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. तसेच पाणी खेचण्यासाठी मोठ्या क्षमतेचे पंप वापरले जात असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. या सर्व बाबींची महापालिका प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून सत्यता तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
समाधान नगर परिसरात सुमारे २६ अधिकृत नळजोडण्या असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. अनेक नागरिकांनी अधिकृत कनेक्शन घेतले असून, मागील सुमारे पाच वर्षांपासून नियमित पाणीबिल भरत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, बिल भरूनही अपेक्षित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
समाधान नगर, जयराम नगर आणि दादूस नगर परिसराची महापालिका प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, दूषित पाण्याची समस्या दूर करावी आणि मुख्य तसेच सब-लाईनवरील अनधिकृत नळजोडण्यांचे सर्वेक्षण करून नियमबाह्य जोडण्या हटवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बी. आर. नगर, शंकर मंदिर आणि टाटा पॉवर रोड परिसरातील कथित अनधिकृत जोडण्या, टँकरद्वारे पाणी विक्री, पाणी खेचण्यासाठी वापरले जाणारे पंप आणि पाणी साठवणुकीच्या टाक्यांची तपासणी करावी. नियमबाह्य बाबी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
अधिकृत नळजोडणी असूनही अनेक वर्षांपासून पुरेसा पाणीपुरवठा न मिळणाऱ्या नागरिकांची समस्या तातडीने सोडवावी. तसेच नागरिकांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसराची पाहणी करून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल तक्रारदारांना द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा हा नागरिकांच्या मूलभूत गरजेबरोबरच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित विषय असल्याने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
