मनोरमानगर परिसरातील घटना; दोन राऊंड फायरिंगनंतर हल्लेखोर पसार, पोलिसांकडून तपास सुरू
ठाणे | प्रतिनिधी
MAHARASHTRA WEBNEWS
ठाण्यातील मनोरमानगर परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर मंगळवारी रात्री गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर दोन राऊंड गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
गोळीबारानंतर पूर्णेकर यांना कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर मॉलजवळील इन्फिनिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केला. घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील परिस्थितीचा आढावा घेत तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पूर्णेकर हे सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय होते. नशामुक्ती आणि अमली पदार्थांविरोधातही ते आवाज उठवत असल्याचे वृत्त आहे. गांजा आणि एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्यांविरोधात त्यांनी गेल्या काही दिवसांपासून भूमिका घेतल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, त्यांच्या या भूमिकेचा आणि झालेल्या हल्ल्याचा थेट संबंध असल्याचे अद्याप पोलिस तपासातून स्पष्ट झालेले नाही.
या घटनेमुळे मनोरमानगर, मानपाडा आणि आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून हल्ल्यामागील कारण, हल्लेखोरांची ओळख आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम याबाबत तपास केला जात आहे.
