साईबाबांना २९ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण

 


शिर्डी : साईबाबांचे दर्शन घेण्यासठी अनेक साईभक्‍त शिर्डीत येत असतात. त्याचबरोबर ते आपल्या साईबाबांना काही ना काही अर्पण करत असतात. २०२४ नवीन वर्षाला आत्ताच सुरुवात झाली असून या सुरुवातीला साईबाबांना त्यांच्या बंगुळुरु येथील एका साई भक्त परिवाराने २९ लाख ४ हजार ९८२ रुपये किमतीचा सोन्‍याचा सुवर्ण मुकुट साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिला आहे. बंगुळुरु येथील साईभक्‍त डॉ. राजाराम कोटा यांनी सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला आहे.

शिर्डी साईबाबांच्या (Sai Baba) दर्शनाला दररोज हजारो भाविक येत असतात. यामधील बहुतेक भाविक हे रोख स्वरुपात किंवा सोने- चांदीच्या स्वरुपात मोठे दान देत असतात. बंगुळुरुमधील (Bengaluru) राजाराम कोटा यांच्या परिवाराने ५०४.६०० ग्रॅम वजनाचा २९ लाख ४ हजार ९८२ रुपये किमतीचा सोन्‍याचा मुकुट साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिला आहे. हा सुवर्ण मुकुट साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने राजाराम कोटा व यांच्या परिवाराचा साईबाबांची मूर्ती व शॉल देऊन सन्मान करण्यात आला.

भुवनेश्वर येथील साईभक्त संभूनाथ सवाई यांनी साईबाबा संस्थानला ८३ ग्राम वजनाचे ४ लाख ७७ हजार रुपये किमतीचे सुवर्णफूल देणगी स्वरुपात दिले आहे. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवले यांच्याकडे दान सुपुर्द करण्यात आले असून देणगीदार सवाई यांचा साई संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

नव्यानेच लॉन्च केलेली सव्वा तीन लाख रुपये किमतीची अपाचे ३१० ही दुचाकी कंपनीनेच साईबाबा संस्थानला दान स्वरूपात दिली आहे. या दुचाकीचे साई मंदिर परिसरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. यावेळी टीव्हीएस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुचाकीची किल्ली संस्थान अधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आली आहे.

दरम्यान, नववर्षाच्या स्वागतालाही साईभक्तांनी शिर्डीमध्ये गर्दी केली होती. याकाळात शिर्डी देवस्थानकडून शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिर्डीमध्ये २३ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान आठ लाख भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. तसेच याकाळात भक्तांनी तब्बल १६ कोटींचे दानही साईचरणी अर्पण केले.

Post a Comment

Previous Post Next Post