ठाणे : आता प्रत्येक कामासाठी आधार कार्ड महत्त्वाचे मानले जात आहे. त्यात आधार कार्डमधील विविध नोंदणी, दुरुस्ती यासाठी पालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीसमोर अथवा आधार केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. प्रत्येक आधार केंद्रात केवळ ५०-१०० फॉर्म मिळत असल्याने नागरिकांना सकाळी लवकर लाईन लावून देखील फॉर्म मिळत नसल्याने जनसामान्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यातच नेते मंडळी देखील आपापल्या वॉर्डात आधार कार्ड शिबीर भरवत असल्यामुळे मूळ आधार केंद्रात फॉर्म कमी मिळत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
आधीच दिवसभरात कामाची धडपड, मुलांची शाळा, गाड्या पकडण्यासाठीची पळापळ ही तर सामान्य नागरिकांच्या पाचवीलाच पूजले आहे. असे असताना आधार कार्डच्या विविध कामांसाठी देखील, नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ठाणे पालिकेच्या प्रभाग समितीत केवळ ५०-१०० फॉर्म मिळत असल्याने नागरिक सकाळपासूनच रेशनच्या लाईनप्रमाणे लाईन लावत असल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहेत. फॉर्मची संख्या कमी असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. फॉर्म देण्यासाठी १०.३० वाजता सुरुवात केली जात असली तरी त्यासाठी सकाळी ७-८ वाजल्यापासून लाईन लावावी लागत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
आगामी काळात निवडणुका असल्यामुळे प्रत्येक नेता जनतेला आकर्षक करण्यासाठी आधार कार्ड शिबीर भरवत आहे, त्यामुळे त्यांना देण्यात येणारे फॉर्म देखील पालिकेकडून मिळत असल्यामुळे, मूळ आधार केंद्रावर फॉर्मची संख्या कमी असल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे.
आधार कार्डबाबत शासनाकडून ऑनलाईन सुविधा देण्यात आली आहे. मात्र दुरुस्ती, नवीन नोंदणी यासाठी आधार केंद्राचाच आधार घ्यावा लागत आहे. मात्र हेच आधार कार्ड नूतनीकरण करण्यासाठी इतर आधार शोधावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ऑनलाईन बुकिंग करण्याची सुविधा शासनाकडून देण्यात आली आहे, मात्र ते केंद्र विभागाबाहेरचे देत असल्यामुळे त्यात आर्थिक, शारीरिक आणि मानसिक हानी होत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
ऑनलाईन सुविधा केवळ नावापुरते
नागरिकांच्या वेळेची बचत, त्रास कमी व्हावा यासाठी
शासनाकडून ऑनलाईन सुविधा देण्यात आल्या आहेत. मात्र त्या प्रत्यक्षात किती कार्यरत आहे, हा एक संशोधनाचा विषय ठरेल.
सकाळपासून लाईन लावून देखील एकच फॉर्म
एकावेळेस एकच फॉर्म मिळत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. एकाच घरातील एकापेक्षा जास्त जणांचे नोंदणी, दुरुस्ती असल्यास त्यांना एका वेळेस एकच फॉर्मच्या आधारे सतत कसरत करावी लागत आहे.एक तर वेळात वेळ काढून लाईन लावायची, नोंदणी, दुरुस्ती अशी कामे असताना देखील एकच फॉर्म मिळत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे चित्र दररोज पहावयास मिळत आहेत.

