बाल्टीमोर: अमेरिकेतील बाल्टीमोर हार्बर परिसरात मंगळवारी सकाळी एक अपघात झाला. एक मालवाहू जहाज बाल्टीमोर बंदर ओलांडणाऱ्या पुलावर आदळले. या अपघातानंतर पूल कोसळला असून या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बाल्टिमोर तटरक्षक अधिकारी मॅथ्यू वेस्ट यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी पुलाचा अंशत: कोसळल्याची माहिती मिळाली. बाल्टिमोर अग्निशमन विभागानेही पूल कोसळल्याची पुष्टी केली आहे. यानंतर मेरीलँड पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
तटरक्षक दल, अग्निशमन विभागासह अनेक यंत्रणांचे म्हणणे आहे की, या दुर्घटनेत अनेकांची जीवितहानी होण्याची शक्यता आहे. पूल कोसळल्यानंतर अनेक गाड्या आणि लोक पाण्यात बुडाल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच अनेक लोक बेपत्ता झाल्याची बातमी आहे. एकूणच या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.बाल्टिमोर अग्निशमन विभागाचे संचालक केविन कार्टराईट यांनी अंदाजे सात लोक आणि अनेक वाहने नदीत वाहून गेल्याची शक्यता वर्तवली आहे.
या जहाजावर सिंगापूरचा ध्वज असल्याचे तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. या मालवाहू जहाजाचे नाव दाली असून ते ९४८ फूट लांब आहे. हे जहाज बाल्टिमोरहून कोलंबो, श्रीलंकेसाठी निघाले होते. यादरम्यान जहाज फ्रान्सिस स्कॉट ब्रिजला धडकले.
हा पूल १९७७ मध्ये सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. प्रसिद्ध अमेरिकन लेखक फ्रान्सिस स्कॉट यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले. फ्रान्सिस स्कॉट ब्रिज १.६ मैल लांब आहे.