निळजे स्टेशनकडे जाणारा नियोजित रस्ता बंद केल्याने रहिवासी आक्रमक

 

दिवा, (आरती मुळीक परब) :  निळजे गावातील विनायक फ्लोरा गृहनिर्माण संस्थेच्या रहिवासी इमारतीच्या जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निळजे रेल्वे स्टेशनकडे जाणारा केडीएमसीचा डीपी प्लान असलेला रस्ता रस्ता भिंत बांधून बंद केल्याने रहिवासी आक्रमक झाले आहेत. त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तासह कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तास निवेदनाद्वारे कळविले आहे. हा पंधरा दिवसात भिंत पाडून रस्ता सुरु न झाल्यास आक्रमक पवित्रा घेत मनपा समोर आंदोलन करणार असलेल्याचे रहिवाश्यांनी सांगितले आहे.


तेथे राहणारे स्थानिक नामदेव पदू पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांकडून येणाऱ्या जाणाऱ्या शाळकरी मुलांना, जेष्ठ नागरिकांना शिवीगाळ व धमकावले जात असून रहिवास्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले असल्याचे महिलांनी सांगितले आहे. तसेच १७ मार्चला अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निळजे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या ७०० ते ८०० मीटरच्या डीपी रस्त्यातच आडवी भिंत उभारल्याने नागरिकांना सोसायटीत जाण्यासाठी वळसा घेऊन जावे लागत आहे. नेमकं हे सगळं कशासाठी केलं जात आहे. याचा नागरिकांना प्रश्न पडला आहे. पाटील विरोधात सरकारी नियम डावलून नागरी रहदारीचा रस्ता अडवून नागरिकांना नाहक त्रास दिल्याबद्दल फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करून त्याची दहशत मोडुन काढून हा रस्ता रहदारीसाठी सुरू करावा अशी, मागणी नागरिकांकडून होत आहे.

ही भिंत केडीएमसीकडून लवकरात लवकर न पाडली गेल्यास आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकाअग्नीशमन दलाची गाडी किंवा दुःखद प्रसंगी अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. प्रकरणी प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास केडीएमसी समोर उग्र आंदोलन करणार असल्याचा पवित्रा विनायक फ्लोरा गृहनिर्माण संस्थेच्या नागरिकांनी घेतला आहे.

शुभांगी शिंदे, रहिवाशी – या रस्त्यात बांधलेल्या भिंतीमुळे आमच्या विनायक फ्लोरा या सोसायटीतील सर्वांना नाहक त्रास होत आहे. मुलांच्या परिक्षा सुरु आहेत. त्यांनी ही ह्या अडवलेल्या रस्त्यामुळे विनाकारण दहा बारा इमारतींना वळसा घालून जावे लागत आहे. या भिंतीच्या आधी त्यांच्या इमारतीच्या खालून जाताना आम्हाला अश्लील शिव्या देणे, कोयता घेऊन अंगार येणे असे प्रकार नामदेव पाटील करत होता. त्यांनी आमच्या रस्त्यात काचा, काटेरी झाडाच्या फांद्या टाकणे असे प्रकार तो करत होता. तरही आम्ही त्याकडे दुर्लक्ष करुन तेथून जात होता. आता तर त्याने भिंत बांधून रस्ता अडवल्याने आम्ही त्याची तक्रार पोलीसांत करुन केडीएमसी प्रशासनाला ही विनंती करत आहोत की लवकरात लवकर ती भिंत तोडून रस्ता खुला करावा. नाही तर आम्हाला दुसरा पर्याय नसल्याने केडीएमसी समोर आंदोलन आणि उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला.




1 Comments

Previous Post Next Post